सुदर्शन सुधा सितारा शिष्यवृत्ती वितरण समारंभ 

जागतिक महिला दिनी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते १०२ मुलींना 'सुधा सितारा' शिष्यवृत्ती


रोहा प्रतिनिधी 


       जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुदर्शन सुधा सितारा शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे," असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काढले.

      सुदर्शन केमिकल्सच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत जागतिक महिला दिनी अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यातील १०२ मुलींना 'सुधा सितारा' शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. सुदर्शन कर्मचारी निवासी संकुलातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हास्ययोग तज्ज्ञ व मोटिवेशनल स्पीकर मकरंद टिल्लू, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस, सामाजिक कार्यकर्त्या निधी गर्ग आदी उपस्थित होते.

    अदिती तटकरे म्हणाल्या, "गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. मुलींमधील गुणवत्ता हेरून त्यांना अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्याची ही कल्पना विलक्षण आहे. गेल्या चार वर्षांत अडीचशेपेक्षा अधिक मुलींना याचा लाभ झाला आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. या उपक्रमाने मुलींमधील आत्मविश्वास वाढवला जाईल. यासह सुदर्शन केमिकल्सने तरुणाईचे मानसिक स्वास्थ्य सक्षम करण्यात पुढाकार घ्यावा. मुलींनी दडपण, तणाव न घेता महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्यावा.

      हास्य आपले जीवन सुंदर बनवते. मन, मेंदू आणि शरीर स्वास्थ्य चांगले ठेवते. त्यामुळे सर्वांनी तणावमुक्त व हास्ययुक्त जीवन जगावे. अपयशाने खचून न जाता सकारात्मक विचारांतून जिद्दीने यशाकडे वाटचाल करावी. सध्याच्या काळात मानसिक ताणतणाव वाढत चालले असून, अशावेळी 'हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा' हा मूलमंत्र आपल्याला आनंदी, निरोगी आयुष्य जगण्यास उपयुक्त ठरतो.असे मत मकरंद टिल्लू मोटिवेशनल स्पीकर यांनी सांगितले.

     प्रास्ताविकात माधुरी सणस म्हणाल्या, "सामाजिक जाणिवेतून २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. गेल्या चार वर्षात २५२ मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती दिली असून, १२८ कर्मचार्‍यांनी पालकत्व स्वीकारले आहे. येत्या काळात रोहा व महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मुलींसाठी हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.सुदर्शन केमिकल कंपनी कायमच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. या उपक्रमातून अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत होत आहे. भविष्यात अनेक कर्मचारी यामध्ये सहभागी होतील आणि हा उपक्रम व्यापक होईल.विवेक गर्ग साईट हेड, सुदर्शन कंपनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

      या शिष्यवृत्तीमध्ये रिया राजेंद्र अंबुसकर, अनुष्का सुधीर जांभेकर, सानिया नसीम खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच डि.जी. तटकरे महाविद्यालय, केईएस मेहेंदळे महाविद्यालय एम.बी.मोरे महाविद्यालय, एम.बी. मोरे महिला महाविद्यालय, सीडी देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, हिरवळ एज्युकेशन सोसायटी, श्री वरदायिनी महाविद्यालय, संस्कारधाम महाविद्यालय, अंजुमन हिमतुल्य इस्लाम महाविद्यालय, केईएसएसपी जैन महाविद्यालय, सावंत कनिष्ठ महाविद्यालय, राठी स्कूल या संस्थांमधील १०२ मुलींना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.अमर चांदणे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कचरे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog