शेतकऱ्यांनी गिरवले सेंद्रिय शेतीचे धडे, तळा कृषी विभागामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन
तळा कृष्णा भोसले
तळा तालुक्यातील खांबवली येथे शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती कार्यशाळचे आयोजन कृषी विभाग व आत्मा तळा यांचे मार्फत करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेस गावचे सरपंच निकिता गायकवाड ,उपसरपंच छाया कसबले, पोलीस पाटील नारायण गायकवाड , मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,कृषी साहाय्यक दिनेश चांदोरकर आत्मा बीटीएम सचिन लोखंडे गाव अध्यक्ष व सेंद्रिय गटातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस आत्मा बीटीएम सचिन लोखंडे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय पद्धत संकल्पना व उद्देश या विषयी विस्तृतपणे माहिती दिली या नंतर मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची कारणमिमांसा करताना सांगितले की, मोठ्या प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके इत्यादींचा वापर यामुळे मानवी आरोग्याला धोका तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा धोकादायक होत गेल्याने शासन सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. कुठल्याही प्रकारचे रसायन न वापरता आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करणे आणि स्वतःचे आरोग्य व जमिनीचे आरोग्य सांभाळणे. शेतीमध्ये खताचे योग्य प्रमाणात नियोजन, शेतीवरील कीड-भुंगा नियोजन व तण नियंत्रण करणे फारच गरजेचे असते.नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती असे सांगितले. सेंद्रिय शेतीमध्ये कीटकांचे व्यवस्थापन करताना चिकट सापळा, कामगंध सापळा, फनेल सापळा इत्यादी सापळे वापरण्यात यावेत तसेच सुधारित नवीन बी-बियाणे आणि वाफा पद्धतीने शेती लागवड केली पाहिजे, असे मार्गदर्शन केले. गांडूळखत, कंपोस्ट खत तसेच सेंद्रिय खत व फवारणी कशी तयार करावयाची यांचे याची माहिती सुद्धा सांगण्यात आली.
अन्नधान्यांचे, फळे, भाजीपाल्याचे संकरित वाण पिकांच्या अधिक उत्पादनासाठी उपयुक्त असले तरी या पिकांना एकाच वेळेस एकसारखे उत्पन्न येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासोबतच शेतीचा खर्च वाढतो आहे. त्यामुळे शेती किफायतशीर ठरत नाही.
शेतीवरील खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची सुरवात करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती जीवामृत, बीजमृत व दशपर्णी अर्क यांची तयार करण्याची पद्धती व उपयोग तसेच फायदे याविषयी कृषी साहाय्यक दिनेश चांदोरकर यांनी मार्गदर्शन केले
Comments
Post a Comment