कोकण पायी दिंडीचे पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये जल्लोषात स्वागत. दर्शनासाठी प्रतिष्ठित नागरिकांची लागली रिघ.
मावळ-प्रतिनिधी
स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबाग कर बाबा यांच्या कृपा छत्राखाली सद् गुरु ह.भ. प.पुरुषोत्तम महाराज पाटील (बापू) यांच्या कुशल मार्गदर्शनाने रोहा ते आळंदी पायी दिंडी सोहळा 2023 याही वर्षी रोह्यावरून प्रस्थान झाला आहे. रायगड जिल्ह्याची सीमा खोपोली येथे ओलांडून खंडाळ्याच्या घाटातून पायी दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात प्रविष्ट झाला. या पायी सोहळ्याचा चौथा दिवस हा अवर्णनीय स्वरूपाचा असतो. लोणावळ्यापासून पुढे मावळ तालुक्यातील कुरवंडे या गावी हा दिंडी सोहळा पोहोचला. ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ, कुरवंडे यांनी या दिंडी सोहळ्याच्या निवासाची व महाप्रसादाचे यजमानपद स्विकारले होते.
त्यामागे सुद्धा एक इतिहास आहे.फार पुर्वी ह.भ.प.सुभाष पडवळ यांचे वडील वैकुंठवासी ह. भ. प. देवराम आप्पा पडवळ यांनी कोकणातून आळंदीकडे जाणारी ही पायी वारी उंच अशा डोंगरातून जाताना पाहिली. त्यावेळी वारकऱ्यांसाठी त्यांनी उत्तम रस्ता बनवून घेतला व वारकऱ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. तेव्हापासून सुरू असलेली ही परंपरा त्यांचे पुत्र हभप सुभाष दादा पडवळ यांनी हा सेवेचा वारसा अखंड सुरू ठेवला आहे. दिवसेंदिवस या सोहळ्यात नाविण्य येत आहे. सुभाष दादा वारकऱ्यांची सेवा तन मन धनाने करीत असतात. त्यांच्या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील.
आजच्या या कार्यक्रमासाठी अखंड मावळ तालुका वारकरी संप्रदायाने आपली उपस्थिती दर्शवली होती. त्याचप्रमाणे मावळचे आमदार,लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती-उपसभापती तसेच परिसरातील सरपंच आणि मावळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेतेमंडळी दर्शनासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले अनेक महान व्यक्तिमत्व यावेळी उपस्थित होते.
कोकण दिंडीचा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी कुरवंडे परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील असंख्य नागरिकांनी कुरवंडे तालुका मावळ येथे गर्दी केली होती.
रोहा ते आळंदी पायी दिंडी कुरवंडे येथे पोहोचताच सर्वप्रथम महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.यावेळी रस्त्यावर सर्वत्र सडा रांगोळ्यां काढलेल्या होत्या.
निवासाचे यजमान पद भूषविलेल्या ह. भ. प. सुभाष दादा पडवळ यांच्या निवासस्थानी दिंडीचे प्रस्थान होताच सर्वप्रथम हरीपाठाचा कार्यक्रम पार पडला. तद्नंतर ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ बापू यांचे कीर्तन झाले.बापूंच्या सुमधुरवाणीने व मार्मिक शब्दप्रयोगाने उपस्थित श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला. विविध क्षेत्रातून आलेल्या सर्वच मान्यवरांनी सद्गुरु ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील बापू यांचे दर्शन घेतले. हभप श्री.सुभाष महाराज पडवळ व परिवाराने सर्व वारकरी व उपस्थितांची सुग्रास महाभोजनाने यथासांग सेवा केली होती. सुभाष दादांचे दातृत्व व कोकण दिंडीचे कर्तृत्व यांचा अलौकिक संगम असलेला नयनरम्य सोहळा अलौकिक स्वरूपाचा होता.
Comments
Post a Comment