रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिक विम्याचे पैसे 3 जानेवारी पूर्वी आदा करा 


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश 

तळा कृष्णा भोसले. 

             पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह 3 जानेवारीपूर्वी आदा करावेत असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


             सन २०२२-२३ मधे रायगड जिल्ह्यातील 7500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम आदा करण्यात आली आहे. मात्र महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.  याविरोधात तळा येथील शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

        त्यासंदर्भात खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत आज मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत राऊत व नामदेव साळवी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        यावेळी खासदार सुनील तटकरे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळपिक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली.

Comments

Popular posts from this blog