तळ्यात पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा,ठाकरे गटाने खाते उघडले,शिंदे गट व भाजपला भोपळा 

तळा -संजय रिकामे

                  तळा तालुक्यात भानंग, तळेगाव, मांदाड, गिरणे, निगुडशेत, चरई खुर्द अशा सहा ग्रामपंचायतींचा निकाल आज घोषित झाला. या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून ठाकरे गटाने खाते उघडले आहे तर शिंदे गट व भाजपला भोपळा मिळाला आहे.यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात प्रथमच उध्दव ठाकरे गटाचे खाते उघडले आहे. तळा तालुका प्रमुख नाना दळवी यांनी भानंग ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे हा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे, शिंदे गटातील बंडानंतर शिवेसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली असताना तळा तालुक्यातून शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.भानंग ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार करण वंदना रामा यांनी शिंदे गटाच्या उमेदवार भऊड सुहानी सुनील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वाजे साक्षी गोविंद यांचा मोठ्या मतांनी पराभव केला.करण वंदना रामा यांना ५६५,भऊड सुहानी सुनील यांना ३२६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वाजे साक्षी गोविंद २५८ मतदान झाले असून नोटा ला १४ मतदान झाले आहे.या विजयामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेला मोठा धक्का बसला आहे.    

                                               
   चरई खुर्द ग्रामपंचायतीवर पंचरंगी लढत होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार अंबार्ले  प्रवीण चंद्रकांत निवडून आले आहेत त्यांना ५०३ मतदान झाले असून चाळके समीर सिताराम २०,शिंदे विश्वदीप विठोबा ९१,सावंत चंद्रकांत बंधू -९३, हीलम चंद्रकांत सखाराम ९६,नोटा १७ असे मतदान झाले.   

         तळेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गट आणि भाजपा यांच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असून त्यांच्या सरपंच पदाच्या उमेदवार चाळके वंदना रवींद्र यांचा विजय झालेला आहे.चाळके वंदना रवींद्र यांना ३१०,भाजपच्या कदम अक्षता वैभव १६३ आणि सावंत मेघना मंगेश २५३, नोटा १६ असे मतदान झाले आहे. त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक १ मधून गायकर गणपत पांडुरंग,काते सुनंदा शंकर व प्रभाग क्रमांक २ मधून कदम स्नेहा महादेव व तळेगावकर सुमती विलास या विजयी झालेल्या आहेत.   

                मांदाड ग्रामपंचायत सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पदाच्या उमेदवार करंजे लता उमेश यांनी शिंदे गटाच्या तांदळेकर रोशनी रमेश यांचा १३६ मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला त्याच प्रमाणे सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून बाणकोटकर वसिम नजीर प्रभाग क्रमांक ३ मधून नाडकर भरत काशिराम,भात्रे सिध्दी गजानन विजयी झाले आहेत.तहसीलदार स्वाती पाटील यांनी मत मोजणीचे उत्कृष्ट नियोजन केले होते तर पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.राजकीय प्रतिष्ठतेसाठी गावातील मतदारांची हौस या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुरी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog