२९० दिवसांत ३६१ गडकिल्ले सर करणाऱ्या सुबोध गांगुर्डे ने साधला रोहेकरांशी संवाद!
रोहा सिटिझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबने केला सुबोधच्या शौर्याचा सन्मान!
सुबोधला माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे केले आवाहन.
रोहा दि. ०८ ऑक्टो. प्रतिनिधी :-
शिवरायांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याचे रक्षण दऱ्याखोऱ्यातील गडकोट किल्यांनी केले. शिवरायांच्या स्फुर्तीदायी इतिहासाची साक्ष देणारे शेकडो गडकिल्ले संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यापैकी ३७० किल्ल्यांवरील माती गोळा करण्याचा संकल्प केलेल्या सुबोधने गेल्या २९० दिवसांत ३६१ गडकिल्ले पादाक्रांत करून सुबोध नुकताच आपल्या गावात रोह्यात आला.
रोहा सिटिझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबने गुरुवारी शासकीय विश्रामगृहात सुबोधच्या गडकोटांवरील सुरू असलेल्या मोहिमेसंदर्भात सेशन आयोजित केले होते. यावेळी सुबोध गांगुर्डे यांनी रोह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांसोबत संवाद साधला, सुबोधशी संवाद साधण्यासाठी आणि सुबोधला प्रोत्साहित करण्यासाठी यावेळी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी साधारणपणे पन्नास लक्ष रुपये खर्च असुन रोहेकरांनी आपल्या रोह्याच्या सन्मानासाठी या खर्चातील जास्तीत जास्त भार उचलावा असे आवाहन रोहा सिटिझन फोरम आणि रोहा प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले. यावेळी रोहा अष्टमीकरांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुनील सानप यांच्या शुभहस्ते सुबोधला सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीनजी परब, निमंत्रक आप्पा देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते मकरंद बारटके, ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुहास खरीवले, माजी अध्यक्ष नरेशजी कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिक्रिया:-
सह्याद्री आणि घाटवाटांमधील हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. त्यात एकट्याने प्रवास करायचा म्हटल्यावर अनेक आव्हान सामोर आली. काही ठिकाणी शरीरांची क्षमता तपासणारी होती. कधी नैसर्गिक आव्हाने होते. या वाटेत पट्टेदारी वाघ, रानगवे, अस्वल, बिबट्या यांचा देखील अनुभव आला. तर कधी जंगलात वाट हरवली. या प्रवासात गडकिल्ल्यांचा भौगोलिक अभ्यास महत्त्वाचा ठरला. उन वारा पाऊस यांचा देखील सामना करावा लागला. मात्र या एकंदरीत प्रवासात महाराजांचे आशीर्वाद आणि महाराष्ट्रातील असंख्य दुर्गप्रेमी शिवप्रेमींच्या सदिच्छांमुळे हा अवघड वाटणारा प्रवासातून माझा मार्ग सुकर झाला.
- सुबोध गांगुर्डे, दुर्गरोहक
Comments
Post a Comment