रोह्यात धुळवडीला आनंदाचे रंग ;

निसर्गाने मात्र रंग बदलले 

रोहा-प्रतिनिधी

 रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात होलिकोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.बच्चे कंपनीपासून ते अबाल वृध्दांपर्यंत अनेकानी रंगांची उधळण करीत या उत्सवाचा आनंद लुटला.काल रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला, त्यामुळे गावोगावी होलिका दहन करताना नागरिकांसमोर मोठी चिंता निर्माण झाली होती.मात्र देवावरील श्रध्देने कुठेही अनुचित प्रकार न घडता पारंपारिक पध्दतीने होलिका दहन कार्यक्रम सुरळीत पार पडला. 

रोहा तालुक्यात नागोठणे वगळता 181 सार्वजनिक व 57 खाजगी एकुण 237 होळ्यांचे दहन करण्यात आले. सोमवारी  दुपारपासुन होळी सजवण्यास ग्रामीण भागांतील लोकांनी सुरूवात केली होती. वयोवृध्द,तरूण व लहान मुलांनी आपापल्यापरिने,जमेल त्या पध्दतीने होळी रचली. यंदा पुर्वा फाल्गुनी पौर्णिमा सकाळीच लागल्याने होळी पूजनासाठी वेळेची बंधने नव्हती. तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी होलिका मातेचे रात्री ९.३० ते १२.०० दरम्यान दहन करण्यात आले.

मंगळवारी रंगाची उधळण करण्यात आली. यंदा मंगळवार असल्याने सोबतीला मांसाहार नसल्याने काहींचा हिरमोड झाला. तरिही लोकांनी या सणात रममान होत धमाल केली. सकाळ पासुनच लहान मुलांनी खऱ्या अर्थानी रंगाची उधळण करण्यास सुरूवात केली. ११ च्या सुमारास उत्सवाला रंगत चढल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरात दिसुन आले. रंगाची खरेदी होत असताना तालुक्यातील मद्य दुकानांबाहेर मोठी गर्दी दिसुन येत होती. 

या वर्षी होळी उत्सवाच्या दरम्यान पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यासह शहरात कोणताही अनुसुचित प्रकार घडला नाही.

एकिकडे नागरिक धुळवडीच्या रंगात मश्गुल झाले असताना निसर्गाने आपले रंग बदलले दिसून आले.सकाळी प्रचंड मेघ गर्जनांनी आसमंत दणाणुन गेला होता.

होळीच्या दिवशी तर,एकाच दिवशी पंचतत्त्वे अथवा पंच महाभुते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नि, वायु व आकाश यांचे दर्शन घडले.

कोकणात होळी पोस्ताचा सण बुधवारी

 कोकणात मोठे महत्व प्राप्त असलेला होळी पोस्ताचा सण धुळवाडीला मंगळवार आल्याने साजरा करता आला नाही. सर्वत्र होळी पेटविल्यानंतर दुसऱ्या म्हणजे धुलवडीच्या दिवशी ग्रामीण भागात व शहरात काही आळींमध्ये होळी निमित्त मटणाचा पोस्त हा सण साजरा करण्याची प्रथा सर्वश्रृत आहे. यंदा मात्र धुळवडीचा दिवस मंगळवार आल्याने तिखट सण साजरा करता आला नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. धुळवड साजरी झाली, मात्र गावागावातील पोस्ताचा कार्यक्रम बुधवारी होणार आहे. होळी आईला मान देऊन,पोस्ताच्या मटणावळीवर हात मारीत खऱ्या अर्थाने हा सण बुधवारी साजरा होणार आहे. धुळवडीला मटणाला मोठी मागणी असल्याने मटण विक्रेत्यांनी रात्री एक वाजल्यापासूनच मटण विक्री सुरू ठेवलेली आढळून आली.मंगळवारअसूनही मटणाला मोठी मागणी होती अशी माहिती एक्सेल स्टॉप येथील मटण विक्रेते अभिजीत कांबळे आणि धाटाव नाका येथील आकाश कांबळे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog