कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेतर्फे धाटाव व गोवे महाविद्यालयात "मराठी भाषा दिन" साजरा

रोहा-प्रतिनिधी

 सध्या स्पर्धेच्या युगामध्ये इतर भाषांचे झालेले अतिक्रमण व अनुकरण वाढत असताना आपल्या मायबोली मराठी भाषेचे सौंदर्य व तिचे महत्त्व जनमानसांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेतर्फे श्री उत्तमराव मोरे यांचे अध्यक्षतेखाली एम. बी. मोरे फाउंडेशन संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात, तसेच प्राचार्य नेहल प्रधान यांचे अध्यक्षतेखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय गोवे कोलाड येथे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेचे खजिनदार हनुमंत शिंदे यांनी हास्य कविता व गजलांचे तसेच उपसचिव सुधीर शिरसागर, प्राचार्य नेहल प्रधान, कवी नारायण पानावकर, अमिषा बारसकर, शरद कदम, सचिव विजय दिवकर व शाखेच्या अध्यक्षा संध्या दिवकर यांनी बहारदार आगरी कविता सादर करून विद्यार्थ्यांचा व उपस्थित मान्यवरांचा आनंद द्विगुणीत केला. 

कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी व गडदुर्ग अभ्यासक रायगड भूषण श्री सुखद राणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मराठी भाषा आणि मराठी भाषा संवर्धनातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान तसेच मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचे उत्कृष्ट विवेचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी धाटाव विद्यालय येथे प्रमुख पाहुणे व कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेचे माजी अध्यक्ष नितीन प्रधान सर यांनी मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी करावयाचे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले. 

धाटाव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न म्हशेळकर यांनी मराठी भाषा जतन, संवर्धन, उत्पत्ती आणि विद्यार्थ्यांचे योगदान या संदर्भात मार्गदर्शन केले. गोवे महाविद्यालयात मराठी भाषा विभाग प्रमुख श्री. सतीश साळवे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले, त्याच बरोबर विद्यार्थी कुमार निलेश जाधव, अभिषेक पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

धाटाव महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोनाली कदम व गोवे महाविद्यालयातील विद्यार्थी रोहन पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. मराठी राजभाषा दिन यशस्वी साजरा करण्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच प्राचार्य प्रसन्न म्हशेळकर प्राध्यापक एम.जी. ढवळे, प्राचार्य नेहल प्रधान प्रा.डॉ.सतीश साळवे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog