बुधवार ठरला तिखटवार, कोकणात सर्वत्र पोस्त सणाची धुम.
आधुनिकीकरणाच्या जमान्यात पारंपारिक भोजन संस्कृती वाढवते सामाजिक सलोखा
रोहा-प्रतिनिधी
डिनर डिप्लोमसी हा शब्द प्रयोग जागतिक स्तरावर प्रशिध्द आहे.एकत्रित जेवण करून मोठ-मोठे डिल केल्याची उदाहरणे चर्चली जातात.मात्र आपल्या कोकणात पोस्ताच्या रुपाने डिनर डिप्लोमसीची परंपरा शेकडो वर्षांपासून सूरु आहे.पुर्वी होळी आईला बोकडाचा मान देऊन ते जेवण एकत्रित शिजवून होळीच्या माळावर पै-पाहूण्यांसोबत जेवण्याची प्रथा होती.पुढे काळानुरुप त्यात बदल होत गेले.
कोकणात होळी दहनानंतर ग्रामीण तसेच शहरीं भागात सर्वत्र मटणाचा पोस्त हा सण साजरा करण्याची प्रथा सर्वश्रृत आहे. यंदा बुधवारी हा तिखटवार ठरला. कोकणवासियांनी मटणावळीवर मनसोक्त हात मारत हा सण साजरा केला. कोकणात सर्वत्र आज पोस्त सणाची धुम दिसुन आली.
पोस्ताचा सण साजरा करण्याची प्रथा शहरासह विषेश करून ग्रामिण भागात प्रचलित आहे. बहुतांशी ठिकाणी होळी पेटविल्यानंतर रात्री पासुनच ग्रामस्थ मंडळी एकत्र येउन होळीच्या शेजारीच पोस्त्याचे नियोजन करतात. यंदा होळी सोमवारी आली तसेच धुळवडीचा दिवस मंगळवारी आल्याने तिखट सण काही साजरा करता आला नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. धुळवड साजरी झाली मात्र ग्रामीण भागात महत्व असलेल्या यासणाचा आनंद लोकांना घेता आला नाही. बुधवारी मात्र लोकांनी पोस्ताच्या मटणावळी वर हात मारीत खऱ्या अर्थाने हा सण साजरा केला.
होळी पोस्ता सणासाठी नेहमीच्या तुलनेत बोकडा ऐवजी मेंढराच्या मटणाला अधिक पसंती दिली जाते. हि प्रथा अनेक ठिकाणी पहावयास मिळते. वर्गणीं बरोबरच काही ठिकाणी गावकीच्या, आळींच्या इत्यादींच्या माध्यमातुन हा सण साजरा करण्याचीही प्रथा आहे.
विविध जाती जमातीचे लोक एकत्रित जेवण बनवितात त्यामुळे जातीभेद,गरीब-श्रीमंत भेद नष्ट होतो,सामाजिक सलोखा राखला जातो.
शिजविलेल्या मटणाचे समान वाटप केले गेलेे. यावेळी पानांच्या हिशेबाने वर्गणी घेण्यात येते. कुणी एक, कुणी दोन, तर कुणी तीन भाग असे मागणी प्रमाणे आधी सुचना केल्यास पाने मिळतात. यांसणाची खरी कला हि मटनाच्या समान वाटपाची असते. पहाटे सर्वजण पोस्ताचे मटण घेण्यासाठी भांडी घेउन वेळेत आणि रांगेत हजर असतात. शिजविलेल्या मटणाचे समान हिस्से करून होणारे पानांचे वाटप म्हण्जे एक कसरतच असते. मात्र वर्षांनुवर्षांच्या अनुभवातुन आणी जुन्या व ज्येष्ट मंडळीच्या मार्गदर्शनातुन हा पोस्त कार्यक्रम सुरळीत संपन्न होतो.
आदल्या दिवसा पासुन पोस्त बनविण्यात परिश्रम घेणारी मंडळी सुर्योदयानंतर होणाऱ्या वाटप प्रक्रिये पर्यंत आपला उत्साह कायम राखतात आणि वाटपानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान पहावयास मिळते.
जुन्या जाणत्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आजची तरुणाई तितक्याच उत्साहाने हा परंपरेचा वसा घेऊन पुढे जात आहे हे कौतुकास्पद आहे.
कोकणात गावागावातुन आणि शहरातील आळी आळीतुन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने ग्रामस्थ एकत्र येतात, सामुहिकरित्या मटण शिजवितात आणि भल्या पहाटे समान हिस्से करून संख्येप्रमाणे पानांचे वाटप केले जाते. रोहा शहरातील अष्टमी मराठा आळी मध्ये गेली सुमारे पन्नास वर्षांहुन अधिक काळ होळी सणाचा हा पोस्त कार्यक्रम नित्य नियमितपणे सुरू होता. कोरोना पश्चात काही ठिकाणचे पोस्त खंडित झाल्याचेही सांगण्यात येते. तालुक्यातील मेढा, हेटवणे, किल्ला, वरसे, पिंगळसई, अशोक नगर, निवी, खारी, आरे,देवकान्हे, धाटाव,मालसई,वाशी आदी गावांसह शहरातील मोरे आळी, अंधारआळी, अष्टमी, दमखाडी, महात्मा फुले नगर आदी ठिकाणे पोस्त्यांसाठी प्रशिध्द आहेत.
प्रतिक्रिया-
"हेटवणे मध्ये होळी पोस्तं हा सण गेली अनेक वर्षे सुरु आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी फार पूर्वीपासून पोस्तं साजरा करायची, गावात वेगळी परिस्थिती निर्माण झाली परंतु आम्ही तरुणांनी पोस्तं बंद पडू दिले नाही, अनेकांच्या परिश्रमातून व सहकार्यातून हि प्रथा अखंडितपणे सुरु ठेवली आहे".
:- अमीर तेलंगे, हेटवणे.
"पोस्त या सणाची आम्ही आतुरतेणे वाट पाहत असतो, चुलीवर शिजविलेले तसेच अनेकांचे हात लागलेल्या या मटनाची चव काही अप्रतिम अशीच असते".
:- अमोल देशमुख, पिंगळसई.
Comments
Post a Comment