तळा तालुक्यातील भानंगकोंड गावाचे बदलले नाव
"वृंदावन" या नावाने गावाची नवीन ओळख
तळा -संजय रिकामे
भानंगकोंड गावाचे नाव बदलून ते "वृंदावन"करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या अनुमती नुसार महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे दि.21.3.23 पासून मौजे भानंगकोंड तालुका.तळा जिल्हा रायगड या गावाचे नाव बदलून ते मौजे वृंदावन तालुका तळा जिल्हा रायगड असे करण्यात यावे अशा प्रकारचा आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी एका पत्रकाद्वारे काढला आहे.
भानंगकोंड गावाचे सुपुत्र कै. सिताराम रामजी रिकामे यांनी गावाचे नामकरण वृंदावन करावे असा प्रस्ताव ग्रामस्थां समोर ठेवला होता या प्रस्तावास मंजुरी देऊन तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे 1992 साली भानंगकोंड ग्रामस्थांनी पत्र व्यवहार केला, तेव्हा पासून आज पर्यंत सामाजिक कार्यकर्ते अनंत विष्णू तांबडे यांनी गावाचे नामकरण वृंदावन व्हावे यासाठी पाठ पुरावा केला रायगड चे खा.सुनील तटकरे लोकसभेवर निवडून गेल्या नंतर या कामाला गती मिळाली खा.तटकरे यांनी भारत सरकारचे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेऊन या प्रस्तावास मंजुरी मिळवून दिली. योगा योग असा की 1992 मध्ये सुनील तटकरे जि.प.चे अध्यक्ष असतांना ठराव मंजूर केला होता. त्या नंतर आता तटकरे खासदार झाल्यावरच या प्रकरणांस अंतिम मंजूरी मिळाली आहे.
भानंगकोंड गावाचे नाव बदलून आता वृंदावन या नावाने गावाची नवीन ओळख होणार आहे अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर ग्रामस्थांना यश आल्यामुळे खा.सुनील तटकरे यांचे ग्रामस्थांनी विशेष आभार मानले आहेत.गेली तीस वर्षे गावाचे नाव बदलण्यासाठी अविरत पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने या कामासाठी वेळ दिला गल्ली पासून दिल्ली पर्यंत पत्र व्यवहार केले ते सामाजिक कार्यकर्ते अनंत तांबडे यांचे देखील सर्वांनी आभार मानले असून वृंदावन ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment