"समाज हेच कुटुंब मानून समाजासाठी शक्य ते योगदान द्यावे"- भारत भूषण जीविता पाटील

"महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान" -उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे

तळा प्रेस क्लब महिला सन्मान सोहळा संपन्न.

तळा- संजय रिकामे 
तळा तालुका प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तळा तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान  तळा नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती अर्चना विजय तांबे, भारत भूषण जिविता पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष मनोज खांबे,पत्रकार मोहन जाधव,तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे जेष्ठ सल्लागार पुरुषोत्तम मुळे,उपाध्यक्ष किशोर पितळे, सरचिटणीस डी. टी. आंबेगावे,नगरसेवक प्रकाश गायकवाड,नगरसेविका अॅड. विद्या रातवडकर, सायली खातू,कृषी अधिकारी अनंत कांबळे ,विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

          प्रत्येकाने स्वतःपुरता व परिवारा पुरता संकूचित विचार न करता संपूर्ण समाज हेच एक कुटुंब मानून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी शक्य ते योगदान द्यावे असे प्रतिपादन भारत भूषण जिविता पाटील यांनी यावेळी केले.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या आपल्या आदर्श असून त्यांच्या विचारावर व मार्गावरच चालण्याचा मी प्रयत्न करते त्यांनी तळा प्रेस क्लब यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या हा योग्य व्यक्तींचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. या व्यक्ती समाजामध्ये खऱ्या अर्थाने काम करत असतात. आणि अशाप्रकारे मान सन्मान मिळाल्यामुळे काम करायला ऊर्जा मिळते, हि मंडळी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात. मानवतेचे , समाजाचे खरे काम हे लोक करत आहेत. या व्यक्तींकडून आम्हाला शिकण्यासारखे आहे असे ही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदनही केले.स्त्रियांवर बंधनं लादण्यापेक्षा आपले विचार बदला. घरातून, समाजातून भक्कम पाठिंबा मिळाला, तर मुली आभाळाला गवसणी घालतायत. मग प्रत्येक दिवस महिला दिन असेल, असा आत्मविश्वास महिलांचा सन्मान करताना त्यांनी केला.

                महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून, स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करत असते ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो त्यामुळे आज हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचा विशेष आनंद होत असल्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते', या पुरुषप्रधान संस्कृतिप्रिय वाक्‍याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही आम्हा "ओव्हरटेक' केले आहे. आपणही पुढे जायचे... या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. महिला आरोग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती काम करते आहे. अशा तळा तालुक्यातील महिलांच्या धडपडीची ही गोष्ट आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान होत आहे याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी तळा प्रेस क्लब कडून विविध क्षेत्रातील महिलांची निवड करून त्यांचा यथोचित सन्मान केल्याबद्दल तळा प्रेस क्लबचे अभिनंदन केले यावेळी रायगड प्रेस क्लब कार्याध्यक्ष मनोज खांबे, पुरस्काराने सन्मानित झालेल्या सरपंच ज्योती पायगुडे, डॉ.विभावरी देशमुख, शामली सातंबेकर ,कल्पना पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          राजकीय विभाग ज्योती कैलास पायगुडे, शिक्षण विभाग कल्पना विजय पाटील, महसूल विभाग शामली सूर्यकांत सातंबेकर, वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर विभावरी नीरज देशमुख, प्रशासकीय सेवा पुष्पा उत्तम नेरकर, सामाजिक कार्यकर्त्या मेघा मनोज सुतार उद्योजिका कल्पना प्रकाश पटेल ग्रामसेविका स्नेहल सुनील बैकर अंगणवाडी सेविका नंदिनी नामदेव तांबडे क्रीडा विभाग कुमारी समिधा संतोष माने वीर माता प्रतिभा प्रकाश कीर्तने कृषी मृणालिनी सतीश पैठणकर यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक पुरुषोत्तम मुळे यांना देखील सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार प्रास्तविक किशोर पितळे यांनी केले तर आभार तळा प्रेस क्लबचे सचिव डी टी आंबेगावे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog