मालसई गावात सापडले ऎतिहासिक अवशेष

इतिहास प्रेमींची मुर्ती पाहण्यासाठी झुंबड

रोहा-प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील मालसई गावात स्मशानभुमीचे काम सुरु असताना उत्खननात काही पुरातन अवशेष आढळून आले.हे समजताच परिसरातील अनेक नागरिकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली.हि बाब शिवप्रेमी ग्रामस्थ योगेश लिलाधर मालुसरे व हेमंत तानाजी मालुसरेंच्या निदर्शनास येताच त्यांनी ह्या अवशेषांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.इतिहास अभ्यासक विश्वास सानप,श्रीकांत स्वामी जंगम,मनोज थिटे यांनी घटनास्थळावर भेट देऊन ऐतिहासिक अवशेषांचे निरिक्षण करुन त्यांचा संबंध थेट मराठे शाहीबरोबर जोडला.

इतिहास अभ्यासक श्री. विश्वास सानप यांनी मांडलेली निरिक्षणे त्यांच्याच शब्दांत.....

          गडकोट म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, याच गडकोटांच्या साथीने छञपतींनीं स्वराज्य निर्माण केले आणि याची सुरुवात जरी राजगड वरुन केली तरी मुख्य कार्यक्षेत्र हे स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड हेच राहिले. याच रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असंख्य गडांची साखळी पहावायास मिळते. त्याच अनुषंगाने येथील अनेक गावे, अनेक ठिकाणे ऎतिहासिक वारसा जपून समृद्ध अशीच आहेत.

           रायगड जिल्ह्यातील, रोहा तालुक्यात प्रामुख्याने चार गडांचा सामावेश आहे ,यातील अवचितगड हा ऎतिहासिक श्रीमंतीने नटलेला गड म्हणून ओळखला जातो.

         शिवकाळापूर्वी समुद्रामार्गे कुंडलीका नदीतून चालणाऱ्या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून अवचितगडाची ओळख आहे. येथून घाटवाटांमार्गे व्यापार चालत असे यातील रेवदंडा येथील चौल हे आंतराष्ट्रीय व्यापारी बंदर होते.

         याच अवचितगड राहाळ परिसरात अनेक ऎतिहासिक दस्तऐवज आणि ऎतिहासिक अवशेष आजही पहावायस मिळतात.

          अवचितगडाच्या कुशीत वसलेले आणि छञपतींचे परम मिञ तथा सुभेदार तानाजी मालुसरेंचा वारसा सांगणारे मालसई गाव आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून तालुक्यात प्रसिद्ध आहे.पूर्वेला डोंगराच्या सोंडेवर बसलेले आणि निसर्गाच्या छञछायेत वसलेल्या मालसई गावातील ऎतिहासिक ठेवा नुकतेच उजेडात आला आणि गावाचा संबंध पुरातन असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

           प्रामुख्याने मालुसऱ्यांची वस्ती असलेल्या मालसई गावात, गावातील महादेव मंदिराच्या परिसरात काही विरगळ आढळून आल्या. सोबतीलाच सती शिळा तसेच भंगलेली शिवपिंड आणि नंदी असे पुरातन महिमा सांगणारे अवशेष आढळून आले आहेत. वर्षानुवर्षे खितपत पडलेली पिंड आणि नंदी मातीमोल होता होता संवर्धीत झाले आहेत.

            महादेव मंदिराच्या परिसरात सापडलेले वीरगळ आणि सती शिळा तसेच अनामिक वीरांच्या समाध्या पहाता गावात तानाजी मालुसरेंचा वारसा जपणारे अनेक वीर स्वराज्य कार्यात धारातीर्थ पडल्याची खाञी होते.

 कदाचित अवचितगडाच्या संरक्षणासाठी गावातील लढव्वया वीरांनी प्राणांची आहुती दिल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.तर वीरगतीला गेलेल्या वीरांच्या पाठोपाठ त्यांच्या स्ञीयाही सती गेल्या मुळे त्या स्ञीयांच्या स्मरणार्थ सती शिळा उभारण्यात आली आहेत.

              आजमितीला एवढा समृद्ध वारसा असणारे मालसई हे एकमेव गाव रोहा तालुक्यात आढळून आले आहे.सर्वांनी नैतिक जबाबदारीने ह्या ऎतिहासिक वारसा सांगणाऱ्या अवशेषांचे व्यवस्थित संवर्धन करावे. येणाऱ्या पिढीला आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाचे संदर्भ प्रज्वलित करुन ठेवावेत.

             "अनेक गावांना फक्त भुगोल असतो तर काही गावांना इतिहास असतो पण आपल्या मालसई गावाला वीर तानाजी मालुसरेंच्या लौकीकाचे वलय आहे याची जाणीव ठेऊन भौगोलिक सामुग्रीच्या साक्षीने आपल्या गावाचा इतिहास समृद्ध करण्याची जबाबदारी गावातील प्रत्येकावर पडते.याची जाणीव ठेऊन मिळालेला ऎतिहासिक ठेवा व्यवस्थित जपला जाईल, पुजला जाईल आणि संशोधन करुन अजून त्यात भर घातली जाईल अशा पद्धतीने संशोधन करण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा".

Comments

Popular posts from this blog