अपघातग्रस्तांना मदत करायला सरसावले 'रोह्यातील पत्रकार'
आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसुन एका निष्पाप माऊलीचा अंत
नागरिकांकडून चौकशीची मागणी
व
रोहा-प्रतिनिधी
रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी मुंबई गोवा मार्गावर इंदापूर लगत असलेल्या भुवन गावाजवळ सकाळी ११ वा च्या सुमारास वृद्ध महिला विठाई उमाजी देवळेकर वय 65 वर्षे या रस्ता ओलांडत होत्या.त्याचवेळी भरधाव वेगाने येत असलेले वाहन वॅगनार क्रमांक एम.एच. 46 बी. क्यू. 0027 याने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत सोडून वाहन चालकाने तेथून पोबारा केला. परंतु माणगाव पोलीस स्टेशनला ही बाब समजताच त्या वाहनाचा पाठलाग करत त्याला पकडण्यात आले.
ह्या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,रोह्यातील पत्रकार दीप वायडेकर, संदीप सरफळे आणि खरीवले हे रोहा येथून रायगड प्रेस च्या कार्यक्रमाकरीता पोलादपूर येथे निघाले होते. त्यांना रस्त्याच्या मधो-मध रक्तबंबाळ अवस्थेत एक महिला आढळून आली. हे बघताच पत्रकारांनी गाडी साईडला घेऊन तिच्याजवळ गेले. तिचा श्वास चालू होता. हे बघताच पत्रकार वायडेकर आणि पत्रकार सरफळे यांनी त्या वृद्ध महिलेला एका मिनिडोरमध्ये टाकून इंदापूर येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या दवाखान्यामध्ये कोणीही डॉक्टर अथवा कर्मचारी वर्ग उपलब्ध नव्हता.भर दिवासा त्या आरोग्य केंद्राला कुलूप लावलेले होते. त्या आरोग्य केंद्राबाहेर इमर्जन्सी सेवा असलेली 102 आणि 108 या रुग्णवाहिका सुद्धा लावलेल्या होत्या. नंतर आजूबाजूच्या व्यक्तींना विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्या रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला कॉल लावला. त्या ड्रायव्हरने त्या व्यक्तीला रुग्णवाहिका खराब झाली आहे, डॉक्टर उपलब्ध नाही, दवाखाना बंद आहे अशी उत्तरे दिली. इंदापूर आरोग्य केंद्रात त्या महिलेचा श्वास अजूनही बाकी होता. ती महिला मृत्यूची झुंज देत होती. हे बघताच पत्रकार मित्रांनी त्या माऊलीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन जायचा निर्णय घेतला. परंतु महामार्गाच्या होत असलेल्या कामामुळे आणि वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगेमुळे रुग्णालयात पोहोचायला खूप उशीर झाला. आणि दुर्दैवी त्या महिलेला तिचा प्राण गमवावा लागला. खरंतर तिच्या दुर्दैवी मृत्यू होण्यामागचे कारण हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विभाग जबाबदार आहे. वेळेवर जर त्या माऊलीला प्राथमिक सुविधा उपलब्ध झाली असती. किंवा रुग्ण वाहिका उपलब्ध झाली असती. तर त्या माऊलीचे आज प्राण गमवायला लागले नसते. आता तरी आरोग्य विभाग या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या संबंधित असलेल्या आरोग्य केंद्रावर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
Comments
Post a Comment