म्हसळा तालुक्यातील घुम गावचे स्वयंभू श्री घुमेश्वर भाविकांचे श्रध्दास्थान

स्वयंभू श्री घुमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी

म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर

  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भुतलावर अनेक देवदेवतांची प्राचीन इतिहास काळातील ऐतिहासिक मंदिरे खेड्यापाड्यात- गाववस्तीवर पहावयास मिळतात. याचाच एक भाग म्हणजे पेशव्यांच्या इतिहासाचा साक्षीदार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होऊन स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि महाराष्ट्र भूषण, थोर निरुपणकार डॉ.नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या निरुपणातून अमूल्य वाणीने रायगड जिल्ह्याचे नाव आज भारतात आणि जगातील काही देशात पोहोचले आहे. त्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळा तालुक्यातील घुम या गावी फार वर्षांपूर्वी जमिनीतून स्वयंभू महादेवाची पिंडी उत्पन्न झाल्याचा इतिहास आहे. घुम येथील महादेवाच्या स्वयंभू पिंडी उत्पन्नाची महती दुरवर पसरत गेली आणि काही वर्षातच घुम या गावाची घुमेश्वराच्या नावाने ओळख निर्माण झाली. म्हसळा तालुक्यापासून घुमेश्वर हे गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे. सद्यस्थितीत श्री घुमेश्वर ग्रामस्थ मंडळाने या ठिकाणी नदीच्या तीरावर भगवान शंकराचे भव्यदिव्य मोठे मंदिर बांधले आहे.

   श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी अशी ओळख असलेले हरिहरेश्वर, म्हसळा तालुक्यात प्रवेश करतानाच एका उंच डोंगरावर देवघर गावातील अमृतेश्वर मंदिर आणि घुम येथील निसर्ग रम्य नदी तीरावरील स्वयंभू श्री घुमेश्वर (महादेवाचे) मंदिर हे तीन भाऊ असल्याचे येथील जुने जाणते भाविक मंडळी सांगतात. अष्टविनायकांचे दर्शन जसे क्रमाने घेतात तसेच भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी पहिले देवघरचे अमृतेश्वर, दुसरे घुमचे स्वयंभू घुमेश्वर आणि तिसरे दक्षिण काशीचे हरिहरेश्वर असे दर्शन घ्यावे.

  मंदिराच्या बाजूनेच शांत आणि संथ गतीने बाराही महिने नदी खळखळून वाहते. नदीच्या प्रवाहात भल्यामोठ्या दगडातून थंडगार झरे सतत वाहत असून तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवीत आहेत. हे थंडगार पाणी प्यायल्यानंतर आपोआपच भाविकांची पाऊले चालती श्री घुमेश्वराची वाट... असे म्हणत मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी वळतात. दर्शन घेतल्यावर भाविक भक्त मंदिरात बसून शांतपणे महादेवाची ध्यान धारणा करतात.

  महादेवाचे मंदिराने घुम गावचे वैभवात वाढ झाल्याने आज घुम गावचे नामोल्लेख घुमेश्वर असे होत आहे. येथे नेहमी प्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीला स्वयंभू श्री घुमेश्वराचे पिंडीवर अभिषेक करून संपूर्ण गावात घरोघरी पालखी सोहळा, वारकरी पोशाख घालून वाजत - गाजत आणि हरिनामाचा गजर करीत मिरवणूक काढून मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात येते. आजूबाजूच्या गावातील भाविक, माहेरवाशीणी मुलाबाळांसह यात्रेत सहभागी होऊन आपले सुख- दुःख महादेवाच्या चरणी मांडून प्रसन्न मुद्रेने दर्शन घेतात. दिवसभर यात्रेमध्ये तालुक्यातील काही व्यापारी आपले वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने थाटून येणाऱ्या भाविकांच्या उत्साहात भर घालतात. गावातील स्थानिक पुरुष, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ, तरुण वर्ग तल्लीन होऊन महाशिवरात्री उत्सवाचा आनंद घेत असतात. "मानव जन्मा येऊनी एकदा तरी जावे पंढरीशी... पहावे विठ्ठला डोळे भरुनी..... या ओविंप्रमाणे दैवी चमत्कारातून स्वयंभू महादेवाची पिंडी उत्पन्न झालेल्या घुमेश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यावे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पर्यटनाचे आनंद घेण्यासाठी घुमेश्वर स्वयंभू शंकराचे मंदिरात प्रत्यक्ष येऊन ... "याची देही याची डोळा, स्वयंभू श्री घुमेश्वराची भेट घ्यावी.." असेच एक धार्मिक व पर्यटनीय स्थळ आहे.

          फार पूर्वीपासून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या निसर्गरम्य अशा घुमेश्वर (घुम) गावात नदीच्या काठावर वसलेले आणि प्राचीन काळापासून ऐतिहासिक महत्व असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्वयंभु श्री घुमेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे शनिवार, दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

        महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटे महादेवाच्या पिंडिवर अभिषेक, गावातून भव्य पालखी मिरवणूक, दिंडी, भजन, आरती, महिलांसाठी हळदीकुंकू अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदाचे वातावरणात साजरा करण्यात आला.

  महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने म्हसळा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्वयंभू श्री घुमेश्वराचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सर्व उपस्थित भाविक भक्तांचे श्री घुमेश्वर ग्रामस्थ व महिला मंडळ, मुंबई मंडळ आणि शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांचे वतीने स्वागत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog