संघर्षाचा महामेरू, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील बुलंद आवाज कुणबी समाजनेते माजी आमदार कै.पा.रा.सानप

कोलाड-श्याम लोखंडे

 ग्रामीण भागातील जनतेला तसेच दुर्बल समाजघटकाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधाची चळवळ उभी करत त्या समाज घटकाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आपले जीव की प्राण असा संघर्षाचा लढा उभारत शेतकरी वर्गाचा बेदखल कुळांचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडणारा नेता कुणबी समाजासाठी सदैव झटणारा नेता माजी आमदार स्व.पा.रा. सानप (दादा साहेब सानप ) आशा महान कर्तृत्ववान नेत्याचे आज 11 फेब्रुवारी रोजी पुण्यस्मरण प्रित्यर्थ विनम्र अभिवादन. 

त्यांच्या जीवनातील एक संघर्षमय प्रवास.तसेच विधिमंडळात सरकारला अन्याया विरोधात जाब विचारणारा असा आमचा नेता .

सामाजिक राजकीय शैक्षणिक चळवळीतील समाज नेते ,सलग तीनवेळा विधानसभा गाजविणारे नेते म्हणजे माजी आमदार स्व.पां.रा.(दादा) सानप यांचा जन्म रोहा तालुक्यातील संभे या गावी झाला. 

त्यांचे शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत रोहा येथे झाले व पुढील शिक्षण पुणे येथे झाले. तद्नंतर सन 1945 साली त्यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सारी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली.  उच्च शिक्षणाचे स्वप्न  अपूर्ण राहिले असले तरी त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून समाज कामांचा ध्यास सोडला नाही. त्यासाठी अधिक भक्कमपणे समाजाची बांधणी करण्याचा निर्णय घेतला .

सन 1957 साली रोहा सुधागड चे दादासाहेब पहिले आमदार

दादा साहेबांना सुरुवातीपासूनच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांचा वारसा पुढे कार्यरत ठेवत राजकारणात ते सक्रिय झाले. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या जीवाभावाच्या विविध प्रश्नांवर काम करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत होते. त्याचप्रमाणे कुटुंबाच्या उत्कर्षासाठी देखील अहोरात्र मेहनत करून आपले कुटूंब एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले होते. समाजातील विविध सामाजिक विषयावर समाज बांधवांच्या बैठका घेत त्यांना न्याय व हक्क मिळवून देत होते.आपल्या विखुरलेल्या कुणबी बांधवांना एकत्र करत समाजाची मोट बांधण्याचे काम त्यांनी त्याकाळात केले होते  कुणबी समाजाच्या एकीच्या बळावरच दादासाहेबांनी सन 1957साली पहिली विधानसभा निवडणूक रोहा- सुधागड या मतदारसंघात लढवत भरघोस मतांनी जिंकली आणि पुढे जनतेशी संपर्क ठेवत जोरदार कामाला सुरुवात केली.

रोहा मुरुड मतदार संघातून दुसऱ्यांदा आमदार शैक्षणिक व सहकार चळवळीत घेतली उंच भरारी 

त्या काळात रोह्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून बोर्डिंगची स्थापना केली.  त्यामुळे त्याचा चांगला फायदा रोहे तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना झाला. तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती आणि भूविकास बँकेची स्थापना केली. पुढे ते सलग दुसऱ्यांदा रोहा -मुरुड या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवत जिंकून आले. त्यापुढे देखील सामाजिक बांधिलकी अधिक जोपासत गावांचा व जनतेच्या कामाचा पाठपुरवठा तसाच चालू ठेवला. दादासाहेबांनी राजकारणात जे अतुलनीय कार्य केले त्याला आजतागायत तोड नाही. कारण एकही दिवस त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी राजकारण केलेले आठवत नाही. तर माझा समाज जो आजही एक अनेक प्रथा- परंपरा, चालीरीती या मध्ये अडकला आहे त्यातून तो बाहेर पडला पाहिजे. तो एका विशिष्ट प्रवाहात आणून त्याला जगण्याच्या नव्या दिशा मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले .म्हणून आज समाजात त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्येकाच्या मनामनात दिसून येत आहे.


शेतकऱ्यांसाठी कालप्रकल्प आणि भात खरेदी विक्री संघाची स्थापना तर विधानसभेत हट्रिक मारत रचला नवा इतिहास

आपल्या विखुरलेला सर्व समाज घटक बांधव तसेच शेतकरी वर्गाला रोहा -माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना दुबार पीक मिळण्यासाठी काळ नदीतुन काल प्रकल्प सरकारकडून मंजूर करून आणला. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला. बारमाही पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे रोहे- महाड येथे औद्योगिक वसाहती वसल्या व त्यामुळे येथील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला. याचा फायदा दादासाहेबांना सन 1967 साली झाला आणि पुन्हा एकदा जनतेचा कौल घेत सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकत एक नवा इतिहास निर्माण झाला . दादासाहेब सलग तीन वेळा जनमतांच्या साक्षीने आमदार झाले आणि त्यामुळे आजही लोकांच्या लक्षात एक अष्टपैलू कुणबी समाजाचा आरसा, समाजनेते म्हणून प्रसिद्धीस आहेत .

 राजकारणात वावरताना त्यांनी सतत सामाजिक तथा नैतिक मूल्यांची असलेली बांधिलकी कायम जपली. त्यामुळे त्यांना सर्वजण समाजनेते असे म्हणतात. आयुष्यभर अनेक प्रकारे संघर्ष करून अशक्यप्राय गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करत शेतकरी बळीराजाच्या हिताची खरेदी विक्री संघाची स्थापना केली.तिथेच भात खरेदी विक्री केंद्र चालू केले. सोबतच कोलाड पॅडी प्रोसेसिंग सहकारी भात गिरणी ची स्थापना केली. या सगळ्याचा आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना फायदा झाला होता.

शेतकऱ्यांसाठी लढा कुलकायद्याच्या जमिनी परत मिळवून देण्यास यशस्वी 

1957 साली मंजूर झालेल्या कूळ कायद्यानुसार सावकारांचे संबंधित कुळांना त्यांच्या जमिनी द्यायच्या होत्या, परंतु काही सावकार त्या जमिनी शेतकऱ्यांना सहजरित्या देण्यास तयार नव्हते .म्हणून त्या विरोधात दादासाहेबांनी त्यांच्या विरोधात लढे उभारले. त्यापैकी गोवे येथील 51 हेक्टर जमीन तेथील सावकारांच्या ताब्यात होती म्हणून त्या विरोधात देखील दादासाहेबांनी लढा उभारला परंतु या लढा दरम्यान दादासाहेबांना सरकारने सहा महिने हद्दपार घोषित केले होते. तद्नंतर पुढील सहा महिने दादासाहेब रानावनात विविध वेशांतर करून राहिले परंतु कायद्याच्या चौकटीत बसवून दादांनी हा लढा यशस्वी करून दाखवला आणि गोवे येथील शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळवून दिला.


दादासाहेबांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळी आस्था तयार झाली होती. असे म्हणतात की जगात तीन प्रकारची माणसे असतात एका प्रवाहासोबत वाहत जाणारी, दोन प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे आणि तिसरे म्हणजे स्वतः प्रवाह निर्माण करणारे. माझ्या मताने खर्‍या अर्थाने सामाजिक तथा अन्य क्षेत्रात दादासाहेबांनी एक नवा प्रवाह निर्माण केला होता.अशा प्रकारे समाजात दादासाहेबांचे राजकीय वजन वाढत चालले होते .त्यामुळे त्यांनी निस्वार्थी प्रयत्न केले पण हे करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांची वा समाजाशी बांधिलकी असणाऱ्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.

अशाप्रकारे समाजकारण आणि राजकारण करत असताना अनेक चढ-उतार आले. परंतु मोठ्या धीराने आणि संघर्षाने त्यांनी त्यावर मात केली परंतु अखेर 11 फेब्रुवारी 1995 रोजी दादासाहेबांना परमेश्वराचे बोलावणे आले .दादासाहेब सानप यांच्या पर्वाचा अखेर अंत झाला.असे महान समाजनेते माजी आमदार स्व.पा. रा. सानप यांच्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक तथा संघर्षमय कार्याला आज  त्यांच्या पूण्यतिथी निमित्ताने कोटी-कोटी प्रणाम.

Comments

Popular posts from this blog