रोहे वर्धमान रेसिडेन्सी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न
खारी/ रोहा -केशव म्हस्के
रोहा तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील वर्धमान रेसिडेन्सी येथील श्री गणपती मंदिरामध्ये माघी गणेश जयंती निमित्ताने बुधवार दि.२५ जानेवारी २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष दयानंद कृष्णा टिकोणे,जेष्ठ नागरिक विनायक घरत,जोशी काका,देवजी जाईलकर अन्य मान्यवर मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली माघी गणेश जन्मोत्सव पुष्पवृष्टीपर प्रवचन आरती,"श्रीं "ची पालखी मिरवणूक सोहोळा,हरिपाठ तद्नंतर महा प्रसाद आदी अध्यात्मिक व धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषामय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले.
माघ शुद्ध चतुर्थी श्री गणेश जयंती जन्मोत्सव वार्षिक सोहळया निमित्ताने सकाळी विधिवत श्रीसत्यनारायणाची महापूजा,श्री गणेश जन्मोत्सव पुष्पवृष्टी पर हभप.भूषण महाराज वरखले (खांब - नडवली) यांची प्रवचन सेवा आरती,सायंकाळी ठिक चार वाजताच्या दरम्यान हभप.राम महाराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली भजन मंडळ मुठवली खुर्द यांच्या साथीने फटाक्यांच्या आतषबाजीने"श्रीं "ची पालखी मिरवणूक सोहोळया दरम्यान गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,ज्ञानोबा माऊली तुकाराम,विठ्ठल माझा माझा माझा मी विठ्ठलाचा हरिनामाच्या गजराने संपूर्ण सोसायटी परिसर दुमदुमले.
सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्मिती झाल्याने उपस्थित श्रीगणेश भाविक भक्तांनी मनमुरादपणे पालखी- दिंडी सोहळयाचा आनंद लुटला.तद्नंतर चहापान सायंकाळी ०६:४५ ते ०७:४५ दरम्यान सामुदायिक हरिपाठ व आरती, देवाला नैवेदय अर्पण करून सर्वांनीच"अन्नदाता सुखी भव" असे शुभाशिर्वाद देत पंचपक्वान्न सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.
सदरील वार्षिक महोत्सव धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सोसायटी रहिवासी सभासदांसह महिला भगिनी वर्ग, बाळगोपाळ,तरुण युवक मंडळ,जेष्ठ नागरिक आबालवृद्धांनी बिल्डिंग परिसर स्वच्छता अभियान जोमाने राबवून चकाचक केले कलर रांगोळी,चुना रांगोळी काढून परिसर सुशोभीकरण करून तन, मन धनाने मोठे योगदान,सहकार्य करीत हातभार लावण्याकामी प्रचंड मेहेनत व अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment