"पुस्तके ही माणसाची मूलभूत गरज"-उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे
पत्रकार पुरुषोत्तम मुळे लिखित 'चाफ्याचे फूल' कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
तळा -संजय रिकामे
पत्रकार पुरुषोत्तम गोविंद मुळे यांनी लिहिलेल्या "चाफ्याचे फूल"या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रायगड भूषण एल. बी. पाटील यांचे शुभ हस्ते, कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सी. डी. देशमुख जयंती व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा याचे औचित्य साधून शनिवार दि १४ जानेवारी, २०२३ रोजी मोठया उत्साहात पार पडला.
याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारोती शिर्के, सचिव मंगेश देशमुख, गो म वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन महेंद्र कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन किरण देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कजबजे, कोमसापचे मुरुड तालुका अध्यक्ष संजय गुंजाळ, दुर्ग अभ्यासक सुखद राणे, कोमसापचे रायगड जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी सदस्य डॉ. सतिश वडके, दीपक कोटिया, महादेव बैकर, दत्तात्रय सप्रे, डॉ.चंद्रकांत विचारे, डॉ. नीरज देशमुख, कोमसापचे तळा तालुका अध्यक्ष हेमंत बारटक्के, प्राचार्य डॉ भगवान लोखंडे, मुख्याध्यापक बी झेड धुमाळ, अंजुमन मुरुड कॉलेजचे प्राचार्य डॉ साजिद शेख, गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, डॉ. श्रीकांत महादाने, पत्रकार संजय रिकामे, किशोर पितळे, संध्या पिंगळे, डी. टी. आंबेगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तके ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे आणि ती असायलाच हवी.पुस्तके माणसाला पूर्णपणे बदलायची ताकद ठेवतात .पुस्तक वाचनाने माणूस जागृत होतो.आयुष्यात विविध प्रसंगी काय करावे आणि काय करू नये याची समज माणसाला पुस्तके देतात. पुरुषोत्तम मुळे यांनी त्यांच्या लेखणीतून नेहमीच दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या तळा तालुका संदर्भात सकारात्मक लेखन केलं आणि त्याचा फायदा तळा तालुक्याला झाला. नेहमी शिकण्याची प्रवृत्ती आणि तरुणांपासून वयोवृध्दापर्यंत संवाद साधण्याची कला त्यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे हे माझे मी भाग्य समजत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडलेलं आहे.पुस्तकांनी मला नेहमीच योग्य ती दिशा दाखवण्याचं कार्य केलं आहे.पुस्तकांनीच मला घडवलंय.योग्य ते लिहायला,बोलायला आणि वागायला शिकवलं आहे.आज मी जो इथे पोचलो आहे ते फक्त पुस्तकामुळेच.पुस्तकानेच मला स्वप्न बघायला आणि ती स्वप्न पूर्ण करायला शिकवलंय..पुस्तक वाचनाने मी आज घडलोय आणि घडतोय.पुस्तकांमुळेच माझ्या विचारांत आमूलाग्र बदल झाले आहेत.पुस्तकांनीच योग्य त्या वेळेवर मला साथ दिली.कोरोना सारख्या भयंकर आजारातून मला बाहेर काढणारी सुद्धा माझी पुस्तकेच होती.त्यांना वाचून,त्यांना बोलून,त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालूनच मी आज इथपर्यंत चा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकलो असल्याचे पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी यावेळी सांगितले आज माझ्या चाफ्याचे फुल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी मान्यवरांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्यासाठी मी सर्वांचा आभारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी चाफ्याचे फूल या कथासंग्रहाबद्दल समीक्षात्मक निरीक्षणे नोंदवली व सर्व कथा वाचनिय असून भविष्यात अशा कथासंग्रहाचे विपूल लेखन व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ भगवान लोखंडे, पाहुण्यांचा परिचय डॉ. नानासाहेब यादव तर निवेदन व आभार सुहास वावेकर यांनी केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते, मुळे परिवार, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखेचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment