रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या सेवारथयात्रेस रोह्यातून प्रारंभ 

रोहा-प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सेवा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून याचा प्रारंभ मंगळवारी रोह्याच्या श्रीराम मारुती चौकातून करण्यात आला. 

गेली पन्नास वर्ष जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षण ,आरोग्य ,संस्कार ,कृषी ,पर्यावरण ,स्वावलंबन ,पुर्वाचल ,आपत्ती आदी विषयांमध्ये सखोल कार्य सुरू असून ,समितीचे हे सुवर्णमोहोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहॆ. 

जनकल्याण समितीचे काम जनमानसात सर्वदूर पोचावे हा या सेवारथाचा प्रमुख उद्देश असून या माध्यमातून रोहा ,पाली ,नागोठणे ,माणगाव ,पोलादपूर ,महाड ,म्हसळा ,श्रीवर्धन ,तळा ,मुरुड आदी ठिकाणी 5000 लोकांपर्यंत संपर्क करण्याचा मानस असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. 

रोहे येथून ह्या सेवारथाचा माजी नगरसेविका तसेच श्री स्वामी समर्थ मठाच्या सेवेकरी सौ. अपर्णा पिंपळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी श्रीराम मंदिर रोहे येथे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन संकल्प सोडण्यात आला. 

जनकल्याण समिती रायगडचे अध्यक्ष श्री. जयेशजी छेडा यांनी यावेळी या सेवारथाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. 

कार्यक्रमाच्या प्रमुख आतिथि सौ. अपर्णा पिंपळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. 

यावेळी जनकल्याण समिती कोकण संभागाचे कार्यवाह श्री. अविनाश धाट , निधी प्रमुख गिरीश पेंडसे ,जनकल्याण समिती रायगड जिल्हा अध्यक्ष जयेश छेडा ,कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे ,निधी प्रमुख ऍड. धनंजय धारप , कोषाध्यक्ष श्रीपाद गिरधर ,सह कार्यवाह सौ. अरुंधती पेंडसे ,शिक्षण /संस्कार आयाम रायगड विभाग प्रमुख सौ. आरती पेंडसे ,सह कोषाध्यक्ष विष्णु जोशी ,जनकल्याण समिती रोहा प्रमुख श्रीनिवास साठे सर ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रोहा तालुका कार्यवाह संजीव कवितके ,भाजपा रोहे शहर अध्यक्ष यज्ञश भांड ,श्री. उत्तम भांड ,मकरंद गोविलकर , अनंत साने आदींसह रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रोहे येथून मेढा व पुढे नागोठणे येथे सेवारथाचे प्रस्थान झाले.

Comments

Popular posts from this blog