अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्काराने सन्मानित

 प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान 

तळा-संजय रिकामे

जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, स्वदेस उपसंचालक तुषार इनामदार यांच्या हस्ते स्वदेस श्रेष्ठ शाळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

     स्वदेस फाउंडेशनच्या वतीने माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी स्वदेस श्रेष्ठ शाळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 126 प्राथमिक व माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सहभागी शाळांचे मूल्यांकन शाळा सिद्धी व स्वदेस ध्येयांच्या धर्तीवर करण्यात आले होते. यानुसार अंतिम फेरीमध्ये 26 शाळा पोहोचल्या होत्या, यांचे मूल्यावर शिक्षणतज्ञांकडून करण्यात आले होते.माध्यमिक शाळेमध्ये तळा तालुक्यातील अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला....! व   प्राथमिक शाळेमध्ये माणगाव तालुक्यातील रानवडेकोंड. 

                        जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी मार्गदर्शन करताना सर्व सहभागी शाळांचे कौतुक केले व प्रत्येक तालुक्यांमध्ये 4 ते 5 आदर्शवत शाळा घडवण्यासाठी पुरस्कारप्राप्त शाळा व गटशिक्षण अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापिका झरीना स्क्रूवाला यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या काळजी सोबत सुप्त गुणांना ओळखून त्यांच्या जडणघडणीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच पुरस्कार प्राप्त शाळांनी शेजारील शाळांना आदर्शवत बनवण्यासाठी मदत करावी. 

       स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करून पालक व गावकऱ्यांचा सहभाग घेऊन शाळेचा विकास कसा साधता येईल, यासाठी शाळेने सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.उपसंचालक नीता हरमलकर यांनी स्वदेस फाउंडेशन शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.

       या कार्यक्रमासाठी सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी 26 शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन सदस्य, स्वदेश फाउंडेशन चे संचालक प्रदीप साठे,महाव्यवस्थापक प्रसाद पाटील व्यवस्थापक मेघना फडके, अर्जून बनकर,अनु झा व दीप्ती खैरे, समीर मोरे,अमित सोनावले उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ व्यस्थापक बाळासाहेब माने, विनोद पाटील उपशिक्षणाधिकारी संतोष शेंडगे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक नीता हरमलकर यांनी केले व आभार उपसंचालक तुषार इनामदार यांनी मानले.

श्रेष्ठ शाळा पुरस्कार पुरस्कार प्राप्त व सहभागी शाळा- 

प्राथमिक शाळा विभाग- रायगड जिल्हा परिषद शाळा, रानवडे कोंड, माणगाव,प्रथम क्रमांक- रु.3 लाख, रायगड जिल्हा परिषद शाळा भाले,माणगाव व्दितीय क्रमांक-रु. 2 लाख, रायगड जिल्हा परिषद शाळा गोंडाळे सुतारकोंड, महाड,तृतीय क्रमांक- रु.1 लाख, रायगड जिल्हा परिषद शाळा सडवली, पोलादपूर, तृतीय क्रमांक- रु.1 लाख.

माध्यमिक शाळा विभाग-अभिनव ज्ञान मंदिर, उसर खुर्द, तळा प्रथम क्रमांक- रु.5 लाख, टाटा विद्यालय, भिरा माणगाव, व्दितीय क्रमांक-रु.3 लाख, एस. एस. निकम इंग्रजी माध्यमिक विद्यालय, तळा तृतीय क्रमांक- रु.2 लाख.

उत्तेजनार्थ पारितोषिक-श्रीवर्धन रायगड जिल्हा परिषद शाळा प्राथमिक, बापवली रु.50 हजार, पोलादपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पार्टेकोंड रु.50 हजार, श्रीवर्धन रायगड जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा, मणेरी नानवली रु.50 हजार, म्हसळारायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आमशेत रु.50 हजार, म्हसळा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेवली रु.50 हजार

Comments

Popular posts from this blog