महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून संतांनी फार मोठी कामगिरी केली -ह.भ.प.आत्माराम महाराज कुटे(शास्त्री)
धाटाव -शशिकांत मोरे
संतांचे आणि समाजाचे विशेष असे नाते आहे.त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणजे एक सामाजिक चळवळ झाली आहे.संतांच्या अभंगानी फार मोठी क्रांती केली आहे.अभंगामुळे समाजातील विविध बदल,परिवर्तन घडण्यासाठी मदत झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून संतांनी फार मोठी कामगिरी केली असल्याचे प्रबोधनात्मक भावोद्गार आळंदी देवाची येथील श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प.आत्माराम महाराज कुटे(शास्त्री) यांनी केले.
हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धाटाव किल्ला पंचक्रोशी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात प्रबोधन करताना ते बोलत होते.राष्ट्रसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा कीर्तनासाठी घेतलेल्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी,देव न लगे देव न लगे,सांठवणाचे रुंधले जागे,देव मंदला देव मंदला, भाव बुडाला काय करूं,देव घ्या फुका देव घ्या फुका,न लगे रुका मोल कांहीं,दुबळा तुका भावेंविण, उधारा देव घेतला ऋण हा चार चरणांचा अभंग त्यांनी घेतला होता.
या अभंगात महाराजांनी परमार्थाची आवश्यकता सांगितली आहे.सुख घ्यायचा असेल,आनंद घ्यायचा असेल तर अशा भक्तिभावाच्या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे.हा संवादात्मक अभंग असून या अभंगात काही चरणात तुकाराम महाराज बोलतात तर काही चरणात लोकं,समाज बोलताना दिसत आहे.या संवादातून क्रांती घडली आहे असेही ते म्हणाले.
या सप्ताह सोहोळ्यात कीर्तनासाठी गायाणाचार्य वैभव खांडेकर,संदेश कळव,नरेश दळवी यांनी तर मृदुंगमनी अनिकेत वारगे,लक्ष्मण सुतार यांनी मोलाची साथ दिली.दरम्यान येथील वातावरण भक्तिमय झाले असून वारकरी मंडळी मोठ्या उत्साहाने याठिकाणी उपस्थित असल्याचे दिसत आहे.
Comments
Post a Comment