बच्चे कंपनीसाठी पर्वणी, तळा शहरात बाल उद्यानाची निर्मिती
उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या पाठपुराव्याला यश
तळा- संजय रिकामे
कोरोना महामारीने गेले दोन वर्ष शाळा बंद होत्या. नुकत्याच सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने लहान मुलांना घरात बंदिस्त करून ठेवले. मग मुलेही प्रचंड वैतागली. त्यात तळा शहरात एकही उद्यान नसल्याने त्यांच्या खेळावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा मेवा’, या पंक्तीप्रमाणे तळा नगरपंचायतीने शहरात श्री.चंडिका देवी परिसरात बाल उद्यानाची निर्मिती केली आहे.या उद्यानामध्ये परिसरातील लहान मुलांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी केले आहे.
तळा नगर पंचायत हद्दीत बच्चे कंपनीसाठी छोटेसे बाल उद्यान असावे अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही जागा नगरपंचायत हद्दीत उपलब्ध करून न दिल्याने लहान मुले आणि पालकांमध्येही नाराजीचा सूर उमटत होता.काही महिन्यांपूर्वी पत्रकार विराज टिळक तळा नगरपंचायत विरोधात उपोषणास बसले होते त्यात देखील त्यांनी बच्चे कंपनीसाठी बाल उद्यानाची मागणी केली होती.उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्याचप्रमाणे श्री.चंडिका माता मंदिर देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र कजबजे आणि सर्व सदस्य, कमिटी मेम्बर यांनी बाल उद्यानासाठी चंडिका परिसरातील जागा उपलब्ध करून दिली त्यामुळे हे शक्य झाले असल्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी सांगून सर्वांचे आभार मानले लहान मुलांना खेळण्यासाठी विविध वस्तू नगरपंचायतीने उपलब्ध करून दिल्या (दि.२७) रोजी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून याचे उद्धघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ. अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मुख्याधिकारी डॉक्टर धीरज चव्हाण,नगरसेवक मंगेश शिगवण,अविनाश रविंद्र पिसाळ, नरेश सुर्वे,प्रकाश गायकवाड,भास्कर गोळे,सिराज खाचे, अॕड.चेतन चव्हाण,नगरसेविका सौ.अर्चना विजय तांबे, कुमारी यामिनी जनार्दन मेहत्तर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment