रोटरी क्लब रोह्याला फुलांचे शहर बनविणार

रोटरीच्या उपक्रमाला आमदार अनिकेतभाई तटकरेंची कौतुकाची थाप

रोहा -प्रतिनिधी

अजान वृक्षाचे रोप रोह्याच्या श्री धावीर देवस्थान परिसरात लावून या स्थानाची अध्यात्मिक उंची इतकी वाढली आहे की इंद्रायणी नदी अथवा चंद्रभागेच्या प्रवाहात स्नान करून श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री पंढरीरायाचे दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य लाभते तेच पुण्य श्री धावीर मंदिरात ध्यान धारणेसाठी येऊन इथल्या अजान वृक्षाचे सान्निध्यात बसून मिळेल. अध्यात्मिक व शास्त्रीय महत्त्व असलेल्या या वृक्षाची जोपासना रोहेकर नक्कीच करतील व दर स्वातंत्र्यदिनाला आज लावलेल्या झाडांचे वाढदिवस साजरा करू असा विश्वास आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा येथे व्यक्त केला. रोटरी क्लब रोहा च्या वतीने ७५० रंगीबेरंगी फुलांची झाडे लावून रोहा शहराला फुलांचे शहर करण्याच्या उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते श्री धावीर मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला, त्याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डाॅ सचिन पुणेकर, श्री धावीर मंदिर देवस्थान विश्वस्त अॅड प्रशांत देशमुख, नगरसेवक महेंद्र गुजर, मकरंद बारटक्के, नवरात्रोत्सव कमिटी अध्यक्ष शैलेश कोळी, रोटरी क्लब रोहा चे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, लायन्स क्लब चे अध्यक्ष अब्बास रोहावाला, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रकाश पवार आदि उपस्थित होते. या उपक्रमात लायन्स क्लब रोहा सहभागी संस्था आहे.

यावेळी बोलताना आमदार अनिकेत तटकरे यांनी रोटरी क्लब रोहा यांनी लायन्स क्लब रोहा च्या सहभागातून हातात घेतलेल्या या उपक्रमात संवर्धन होणा-या झाडांचा रंग व सुगंध रोह्यात पर्यटकांना नक्की, च आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त करून या निमित्ताने विविध वृक्षांचे अध्यात्मिक, ऐतिहासिक  व शास्त्रीय महत्त्व सर्वांना कळेल असा आशावाद व्यक्त केला.

डाॅ सचिन पुणेकर यांनी आज लावलेल्या अजान वृक्षाचे रोप श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी स्थानावरील अजान वृक्षापासून तयार झाले असल्याचे सांगून अध्यात्मिक ज्ञान प्राप्ती व वृद्धी साठी या वृक्षाची सावली उपयुक्त असल्याचे सांगितले. यामागे शास्त्राचा आधार असल्याचे सांगताना या वृक्षाची पानातून मिळणा-या रसाने मेंदूची उपयुक्त संप्रेरके मिळतात व मूळातून ओझोन वायू बाहेर पडत असल्याने त्याचा पर्यावरण संवर्धनासाठी उपयोग होत असल्याचे सांगितले. यावेळी अजान वृक्ष व सुवर्ण पिंपळ वृक्षावर भारतीय टपाल खात्याने प्रकाशित केलेले तिकिट यावेळी रोहेकरांसाठी प्रकाशित करण्यात आले. 

रोटरी क्लब रोहा चे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर यांनी बहावा, गुलमोहर, सुवर्णपुष्प, पळस, कांचन अशा रंगीबेरंगी फुलांच्या झाडांच्या माध्यमातून रोहा फुलांचे शहर हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून या बरोबर सुवर्ण पिंपळ व चंदन या वृक्षाची रोपे लावणार असल्याचे सांगितले. सर्व रोहेकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन रोह्याला फुलांचे शहर करण्याच्या चळवळीचे साक्षीदार होण्याचे आवाहन सुरेंद्र निंबाळकर यांनी केले.

सुखद राणे यांनी सूत्रसंचालन केले तर विदुला परांजपे व सहकारी सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 

वृक्षारोपण कार्यक्रमात अंधार आळी ग्रामस्थ मंडळ, धनगर आळी ग्रामस्थ, दमखाडी ग्रामस्थ, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, ब्राम्हण मंडळ रोहा  सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog