तळ्यातील पत्रकाराने तयार केली भन्नाट इलेक्ट्रिक कार

फक्त 30 रूपयांत धावते तब्बल 80 किमी अंतर 

तळा - संजय रिकामे

सध्या जगभरात पर्यावरणासाठी घातक ठरणारं वायू प्रदूषण  टाळण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या देशातही अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात असून, अनेक वाहन उत्पादक कंपन्याही इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करत आहेत. त्यांच्या किमती कमी करता याव्यात, त्यांचा वापर अधिकाधिक सहज व्हावा यासाठी संशोधन सुरू असून, सरकारी पातळीवर, तसंच वाहन कंपन्यांच्या स्तरावर देखील विद्यार्थ्यांना  नावीन्यपूर्ण वाहननिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या पार्श्वभूमीवर सध्या चर्चा आहे ती रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एका पत्रकाराने तयार केलेल्या अनोख्या इलेक्ट्रिक कारची.

 तळा शहरात पुसाटी इथला रहिवाशी असलेला आणि सध्या केबल ऑपरेटर आणि पत्रकार असलेल्या विराज वसंत टिळक याने अवघ्या 30 रुपयांमध्ये 80 किलोमीटर्स धावणारी इलेक्ट्रिक कार बनवली असून, यासाठी फक्त दीड लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे, या दोन सीटर कारचा लूक जीपसारखा  आहे. त्यामुळे ती दिसतेही अत्यंत आकर्षक त्याचबरोबर आधुनिक कारमध्ये असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा त्या कारमध्ये आहेत. तिची बॅटरी सुमारे 4 तासांत पूर्ण चार्ज होते.       
          एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणाचंही प्रचंड नुकसान होत आहे, याचा विचार करून ही इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली असल्याचं विराज टिळक यानं सांगितलं. एकदा चार्ज केल्यानंतर ती 80 किलोमीटर्स धावेल. त्यासाठी फक्त 30 रुपये खर्च येईल. ही कार आधुनिक वाहनांसारखी बनवण्यात आली असून इतर वाहनांप्रमाणे  त्याचा स्पीडोमीटर गती, तसंच बॅटरी पॉवर दाखवतो. ही कार 1 तासात 30 किलोमीटर अंतर कापते. यात रिव्हर्स मोडसाठी देखील सुविधा उपलब्ध  आहे. याशिवाय त्यामध्ये एमसीबी बॉक्सचीही  व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही बिघाड लगेच लक्षात येईल.             

 या कारमध्ये सीटखाली बॅटरी बसवण्यात आली असून, बॉनेटखाली स्टेपनी बसवली आहे. इतर कोणत्याही कारप्रमाणे हिला हॅंड ब्रेक आहे  असंही विराज टिळक यानं सांगितलं. सध्या सर्वत्र या कारची चर्चा असून या कारचा फॉर्म्युला ऑटोमोबाइल कंपन्यांना आवडला तर इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेला नवी दिशा मिळेल, असं मानलं जात आहे. विराज टिळक याचं या अनोख्या कारच्या निर्मितीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. लॉक डाऊनच्या काळात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले, तालुका हा दुर्गम डोंगराळ आहे येथे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही रोजगानिर्मिती व्हावी या दृष्ककोनातून हा प्रयोग केला आहे आणि त्यात यशस्वी झालो असल्याचे विराज टिळक यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog