"शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम होणे काळाची गरज"-सौ.रश्मी साळी
रा.जि.प.शाळा धामणसई येथे केंद्रस्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न
रोहा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळा धामणसई तालुका रोहा येथे दिनांक 14 मार्च 2022 व दिनांक 15 मार्च 2022 रोजी शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण केंद्र स्तर प्रशिक्षण संपन्न झाले.पिंगळसई केंद्राच्या केंद्रप्रमुख रश्मी साळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रशिक्षणात त्यांनी उपरोक्त विधान केले.
धामणसई शाळेच्या सहशिक्षिका सौ. साधना आंबेकर यांनी उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले. केंद्रप्रमुख सौ. रश्मी साळी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन संपन्न झाले. सर्व उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षणार्थींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर दयाराम भोईर,उस्मिता आयरे,रविंद्र ठाकूर,दिनेश रटाटे इ.ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे विश्वनाथ थिटे,विष्णू भोईर,रुपाली चाळके,प्रविण भोईर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रप्रमुख सौ. रश्मी साळी यांनी प्रास्ताविकात शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण व्यवस्था यामधील सहसंबंध विषद केला, शालेय भौतिक सुविधांसाठी शाळा व्यवस्थापन समितीने प्रयत्न करावेत, असे उपस्थितांना आवाहन केले. कोरोना काळात शाळा व्यवस्थापन समितीने केलेल्या सहकार्यामुळेच शाळांचे काम पूर्ववत होऊ शकले, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
प्रशिक्षक श्री.दिपक मांडलुस्कर यांनी शालेय आपत्ती व्यवस्थापन, बालकांचे हक्क व सुरक्षितता, माझी शाळा- माझी जबाबदारी इत्यादी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण ,स्थलांतरित बालकांचे प्रश्न व शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षक श्री.अरुण आगळे यांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, शाळा व्यवस्थापन समितीची रचना, शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये, शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणाची कारणमिमांसा, शाळा व्यवस्थापन समिती व शैक्षणिक गुणवत्ता यांचा सहसंबंध या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
धामणसई शाळेचे मुख्याध्यापक श्री.घनश्याम म्हात्रे यांनी,इंग्रजी माध्यम शाळांपेक्षा मराठी माध्यमाच्या शाळा कशा अग्रेसर आहेत? हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. भौतिक सुविधा उपलब्धते बाबत धामणसई शाळेची यशोगाथा प्रशिक्षणार्थी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसमोर मांडली.त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या अभ्यासपुर्ण मार्गदर्शनाखाली चर्चा घडवून आणली.
शेवटी दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रप्रमुख सौ. रश्मी साळी यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.जि.प.शाळा धामणसई शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम म्हात्रे,उपशिक्षक शशिकांत शेळके,साधना आंबेकर,कृष्णा नाकती,गणेश गर्जे इत्यादी शिक्षकांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment