आदर्श शाळा वायशेत येथे दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत रायगड भूषण प्राप्त मान्यवरांची- मुलाखत व सत्कार संपन्न 

अलिबाग-प्रतिनिधी

         स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ मा. डॉक्टर किरण पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून व मा. ज्योत्स्ना शिंदे पवार शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या  मार्गदर्शनाने जिल्हा परिषद शाळेमध्ये दर शनिवारी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे केले जातात. त्या अनुषंगाने रा.जि.प. आदर्श उच्च प्राथमिक शाळा वायशेत, तालुका अलिबाग येथे प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती घेऊन साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद वायशेत शाळेचे माजी विद्यार्थी श्री सचिन पाटील सर व लोणारे येथील कुमारी शर्वीका जितेन म्हात्रे यांना या वर्षी रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती व्हावे व प्रेरणा मिळावी यासाठी दोन्ही मान्यवरांना शाळेत बोलावून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला यावेळी दोघांचेही मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे ठरले.

श्री. सचिन पाटील सर हे शरीर सौष्ठव स्पर्धेनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्बेकिस्तान येथे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. व त्यांनी चौथा क्रमांक पटकावून देशाला सन्मान मिळवून दिला.  अत्यंत मेहनत, चिकाटी व जिद्दीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले. त्यांच्या लहानपणी गावातील हरिश्चंद्र लोणारकर बुवा यांना रायगड भूषण पुरस्कार घेताना पाहिले होते, तसा पुरस्कार मलाही प्राप्त व्हावा असे स्वप्न मी पाहिले त्यासाठी अहोरात्र मेहनत, अथक परिश्रम करून आज त्या पुरस्कारापर्यंत पोहोचलो असे सचिन पाटील यांनी सांगितले. आज त्यांनी अलिबाग शहरामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःची जिम सुरू केली आहे व ट्रेनर म्हणून काम सांभाळत आहेत. मा.जिल्हाधिकारी,मा.उपजिल्हाधिकारी तसेच सीईओ साहेब आदी मान्यवरांना सुद्धा या जिम च्या माध्यमातून  व्यायामाचे प्रशिक्षण देत आहे याचा मला अभिमान वाटतो असे सांगितले. त्यांच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच रायगड भूषण सारखे पुरस्कार मिळालेले आहेत हे ते कौतुकाने सांगतात. शाळेतील विद्यार्थी मित्रांसाठी पुन्हा स्वतंत्र कार्यशाळा घेऊन अधिक मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील पाच वर्षाची बालिका शर्वीका जितेन म्हात्रे हिला सुद्धा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वात कमी वयात हा पुरस्कार घेण्याचा बहुमान सुद्धा तिला मिळाला आहे. गिनीज रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ओ.एम.जी. असे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या चिमुकली चा वाढदिवस रा.जि.प. शाळा वायशेत येथे साजरा करण्यात आला. यावेळी तिच्या छायाचित्रांची चित्रफित मुलांना दाखविण्यात आली व तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला सर्वात कमी वयात छत्तीस गड किल्ले चढणारी त्याच सोबत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई व गुजरात येथील दहा हजार पायऱ्या असलेला गिरनार पर्वत सुद्धा शर्विकाने लीलया पार केला आणि यापुढील तिची मोहीम ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची असणार आहे. तिच्या सवयी, आवडी- निवडी व तिच्या मेहनती बद्दल सांगताना तिचे पालक जितेन म्हात्रे यांचा अभिमान ओसंडून वाहत होता.  छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्च मानाचे व जागतिक कीर्तीचे राजे आहेत. तुम्ही सुद्धा कोणत्याही क्षेत्रात जा पण त्या प्रत्येक क्षेत्रातील छत्रपती शिवाजीराजे बना असा संदेश त्यांनी मुलांना दिला. त्यासाठी तुमचा धर्म, जात, पंथ, आई-बाबांचं कामाचं स्वरूप याकडे लक्ष न देता तुमची आवड ओळखा आणि ती जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा असा मोलाचा सल्ला सुद्धा त्यांनी या वेळेला दिला.

   या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आदरणीय जयवंत गायकवाड साहेब एडवोकेट भूषण जंजीरकर, सी. ए. गौरव माळी, उद्योजक संदीप पाटील वायशेत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ निकिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची संकल्पना व  सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक श्री संदीप वारगे यांनी केले . शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक संतोष गावंड व विज्ञान शिक्षक अमोल नागावकर यांनी मनोगत सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा श्रीकांत पारगे यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शाळेने केल्याबद्दल मा. गायकवाड साहेबांनी शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाच्या समारोप  प्रसंगी शर्विकाच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापून विद्यार्थ्यांना खाऊ व साहित्य देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog