शिवजयंती निमित्त ढोल-ताशांच्या

 गजरात धाटावमधे भव्य मिरवणूक

"छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा आजच्या राजकारण्यांत नाही"- इतिहास संशोधक प्रा.विक्रम कदम

धाटाव-शशिकांत मोरे

      छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शौर्य व धैर्याचा होता.त्यांचा अंधश्रद्धा,अनिष्ट प्रथा परंपरा रुढी यावर बिलकुल विश्वास नव्हता.शिवरायांनी राज्य केले ते रयतेसाठी.,स्वत:चा कधी विचारही केला नाही.म्हणून तर शिवरायांवर जीव ओवाळून टाकण्यासाठी विविध धर्म व जातीपातीचे मावळे प्राण तळहातावर घेऊन तयार असत.लढाया या मनगटावर नव्हे तर बुद्धी कौशल्यावर जिंकायच्या असतात हे तत्व व्यवहारात व खासगी जीवनात तंतोतंत लागू पडते निष्ठा आणि जबाबदारी यांची खरी जाणीव ही शिवचरित्राचा अभ्यास केल्यावर होते.आज जगातील अनेक देशांची शासन प्रणाली ही शिवचरित्रावर आधारित चालली असल्याचे पदोपदी दिसत आहे.आजच्या राजकीय परिस्थितीत सर्वत्र बजबजपुरी माजली आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी सदाचाराची सारी तत्वे बाजूला ठेवली जात आहेत.राजकारण हा सेवा नव्हे तर धंदा झाला आहे.राजकारणाला भ्रष्टाचार व घराणेशाहीची किड लागलेली दिसत आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा आजच्या राजकारण्यांत नसल्याचे या सद्यस्थितीवर तोफ डागताना प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते व इतिहास संशोधक,अभ्यासक प्राध्यापक विक्रम कदम यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.



   धाटाव येथील सोनारसिध्द ग्रामस्थ,महिला व तरुण वर्गाने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहोळ्यात व्याख्यानात बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय मोरे,सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष प्रदीप देशमुख,प्रशांत देशमुख,चंद्रकांत मालुसरे,किशोर रटाटे,सूर्यकांत मोरे,सुहास येरूनकर,अनंता म्हस्कर,दिलीप धोंडगे,गणेश म्हस्कर,संतोष रटाटे,विवेक जोशी,योगेश भगत यांसह मान्यवर उपस्थित होते.याठिकाणी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेल्या कलावंतांना सन्मानित करण्यात आले.

     आपल्या आक्रमक व्याख्यानात इतिहासाची ज्वलंत उदाहरणे सादर करून तरुणांना प्रोत्साहित करताना कदम यांनी पुढे सांगितले की आज छत्रपतींचा खरा इतिहास शिकविला जात नाही.शिवाजी महाराज काळाच्याही पुढे जाऊन राज्य करणारे राजे होते.छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे.शिवाजी महाराजांची स्मृती जागवायची असेल तर प्रथम आपल्या भाषेचा आपणास अभिमान हवा.आपली संस्कृती जाणून घेण्यासाठी इतिहास शिकायला हवा.शिवाजी या नावातच शिका,वागा व जग जिंका,असे अभिप्रेत आहे.मराठी माणसाने प्रथम शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घ्यायला पाहिजे व आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले पाहिजे. जगभरातील ज्ञानाचा आणि प्रवासाचा अनुभव घेऊन आपल्या मुलांना जगण्याचा चांगला दृष्टिकोन द्यायला हवा.दरम्यान गावातून व इतर परिसरातून असंख्य शिवभक्त याठिकाणी व्याख्यान ऐकावयास उपस्थित होते.

 शिवजयंती उत्सव सोहोळ्यात रायगड वरून आणलेल्या शिवज्योतीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.तर विधिवत पूजा झाल्यानंतर छत्रपती शिवारायांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.यामधे सर्व महिला,लहान मुले,मुलींनी सक्रिय सहभाग घेतल्याचे पहावयास मिळाले.गावात दारोदारी छत्रपती शिवरायांच्या पालखीचे औक्षण आणि स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी यांसह विविध जयघोषाने परिसर दणाणला होता.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाशिलकर,मिथुन मालुसरे,अभिजित मोरे,धनंजय रटाटे,नरेश म्हस्कर,केतन धोंडगे,ज्ञानेश्वर जाधव,योगेश म्हस्कर,शुभम मोरे,सागर शेलार यांसह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.प्राध्यापक विक्रम कदम यांनीही या तरुणांचे उत्तम नियोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

Comments

  1. छञपती शिवाजी महाराज हे एक अलौकिक व्यक्ती मत्व होते. आजच्या पिढीला शिवचरित्र अंगिकारण्याची नितांत आवश्यकता आहे. जय भवानी जय शिवाजी।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog