धाटावमध्ये शिवजयंती उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी 

साताऱ्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विक्रम कदम यांची तोफ धडाडणार

शरद जाधव-कोलाड

      रोहा तालुक्यातील धाटावमध्ये शिवजयंती निमित्त सातारा येथील प्राध्यापक तथा सुप्रसिद्ध वक्ते,इतिहास अभ्यासक विक्रम कदम यांची तोफ धडधडणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवंत इतिहास ते आपल्या व्याख्यानात सादर करणार आहेत.शिवजयंती निमित्त नियोजन केलेल्या या भरगच्च कार्यक्रमात कदम यांच्या व्याख्यानाने हा परिसर दणाणुन जाणार आहे.कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आल्याने येथील वातावरण शिवमय झाले असून येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी धाटाव मधील तरुण वर्ग सज्ज झाले आहेत.

       सालाबाद प्रमाणे यावर्षीही सोनारसिद्ध ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान शुक्रवार १८ रोजी गावातील युवक शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रायगड कडे जाणार आहेत.तर शनिवारी १९ रोजी पहाटे ४:०० वा. एक धाव माझ्या राजासाठी या संकल्पनेवर किल्ले रायगड ते धाटाव असा शिवज्योत घेऊन प्रवास असणार आहे.त्यानंतर १० वाजता एम,आय.डी.सी,मोरे वसाहत व बारसोली ग्रामस्थांच्या वतीने शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.तर सकाळी ११ वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती व विधिवत पूजन होणार आहे.३ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळ्यात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.मिरवणुकी दरम्यान काही लहान मुलं शिवकालीन वेशभूषा परिधान करणार असल्याने या क्षणाचे सर्वांना साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.तर रात्री सातारा येथील सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक,प्राध्यापक विक्रम कदम यांचे शिवव्याख्यान होणार आहे.

       कदम यांनी लातूर येथे महात्मा बसवेश्वर महाविद्यालय शिक्षण घेतले आहे.तर दयानंद लॉ कॉलेज मध्ये एल.एल.बी पूर्ण केले आहे.( एम. ए.मराठी - पुणे विद्यापीठ , SET , एम ए - इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , SET , बी एड - शिवाजी मराठा सोसायटी चे अध्यापक महाविद्यालय पुणे.) तर जिजाऊ चरित्र ,शिवचरित्र,शंभुराजे चरित्र संत तुकाराम महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे,क्रांतिसिंह नाना पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील भारतीय संविधान,इ विषयावर महाराष्ट्रभर शेकडो व्याख्याने केली आहेत.गेली १३ वर्ष लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत.

     या शिवजयंती उत्सव सोहळ्याची धाटाव मधील तरुण वर्गाने जय्यत तयारी केली असून विविध ठिकाणावरून येणाऱ्या शिवभक्तांच्या स्वागतासाठी गावातील सर्वच तरुण वर्ग सज्ज असल्याचे पहावयास मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog