आमदार कै.पा.रा.सानप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा झुंजार नेता,
तरुणांनो समाज संघटित करा :- शंकरराव म्हसकर
कोलाड -श्याम लोखंडे
४० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसे, त्या काळात आमदार पा.रा.सानप यांनी सहकार क्षेत्राची निर्मिती केली व शेतीचे मालक कुळ झाले पाहिजे यासाठी दादासाहेब यांनी सर्वांना एकत्रित करून मोठा लढा दिला व संघर्ष केला.त्याकाळात तालुक्यातील गोवे येथील ५७ एकर जमीन काबीज करण्याचा सरकार प्रयत्न करित होते परंतु खंदे समर्थक रावजी जाधव (कारभारी)विठ्ठल पवार व इतर १६ नेते हाताशी घेऊन संघर्ष करून आमदार पा.रा.सानप यांनी तो प्रयत्न हाणुन पाडला होता. खऱ्या अर्थाने पा.रा.सानप हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे झुंझार नेते होते.त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांचे कार्य अविरतपणे पुढे नेण्यासाठी तरुणांनो तंटे मिटविण्यात वेळ घालविण्यापेक्षा समाज संघटित करा. त्यांचा आदर्श निर्माण केला पाहिजे समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत कै. पा. रा. सानप यांच्या स्मृतिदिनी कोलाड ग्रुप कुणबी समाजाच्या सभेत कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी व्यक्त केले.
कुणबी समाजनेते तथा माजी आमदार स्व. पा.रा.सानप यांचे 27 वे पुण्यस्मरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघ मुबंई व रायगड जिल्हा समन्वय समिती ग्रामीण शाखा रोहा ग्रुप कोलाड च्या वतीने कोलाड येथील मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते .यावेळी विचारमंचावर खांब विभागीय नेते रामचंद्र चितळकर, नारायणराव धनवी,मारुती खांडेकर,ऍड. सुनिल सानप, राजेश सानप, रोहा पंचायत समितीच्या सदस्या व माजी सभापती सौ.विणाताई चितळकर, विजय सानप,दिवाणशेठ सानप,प्रमुख मान्यवर व कोलाड विभागातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की सलग तीन वेळा दादासाहेब विधिमंडळात जनमतांवर निवडून गेले, त्यावेळी ग्रामीण जनतेची व शेतकऱ्यांची उपजीविका म्हणजे शेती. त्यामुळे त्याला हमी भाव मिळाला पाहिजे ,तसेच बेदखल कुळांचा प्रश्न यासाठी आवाज उठवत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न दादासाहेबांनी विधानभवनातुन केला.
समाज पुढे नेण्यासाठी आपल्या समाजाचे जातीचे दाखले,रूढी परंपरानुसार चाललेले अतिरिक्त खर्च टाळणे,शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणे यासाठी तरुण व जेष्ठ एकत्र येऊन मार्ग कसा काढता येईल असे प्रयत्न केले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने कुणबी समाजाचे नेते माजी आमदार पा. रा.सानप यांचा स्मृतीस अभिवादन ठरेल.तर नंदकुमार मरवडे सर यांनी आपल्या काव्यातुन संभे गावाचे सुपत्र आमदार पा.रा.सानप यांना आदरांजली वाहिली, त्यांच्या गायनाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Comments
Post a Comment