दुरावलेल्या मित्रांना सोशल मीडियाने आणले एकत्र
२८ वर्षानंतर सवंगड्यांनी अनुभवला "हायस्कूलचा एक दिवस"
रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या धाटाव हायस्कूलमधील १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचने तब्बल २८ वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला.सोशल मीडियाच्या माध्यमातून दुरावलेल्या मित्र,मैत्रिणी एकत्र येऊन शालेय जीवनातील असंख्य आठवणीना उजाळा देत एकमेकाशी हितगुज केले.अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले.
आपण कितीही मोठे झालो,वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही.सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उत्तम म्हस्कर यांने या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला.अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली.दिवस ठरला रविवार २३ जानेवारी स्नेहसंमेलनाचा.त्या दिवशी सकाळपासूनच धाटाव हायस्कूलचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते.ठरलेल्या वेळेत जे जे येत होते ते सर्वच एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत होते.दूर दूर राहून कित्येक वर्षाने एकमेकांना भेटत असल्याने स्वतःच्या मोबाईल मध्ये सेल्फी काढण्याचा मोह सुद्धा अनेकांना आवरता आला नाही.
सर्वजण आल्यानंतर आपल्या समूहातून अचानक काळाच्या पडद्याआड गेलेल्या बालाजी गरड,पांडुरंग शेळके आणि नथुराम जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.राजकारणाचे धडे घेणाऱ्या सतीशने प्रगत शेतकऱ्यांच्या भाजी व इतर व्यवसायाचे दर्शन घडविले.तर डोळ्यांच्या कटाक्षाने टेहळणी करणाऱ्या रविराजने सर्वांना कुंडलिकेचा तिर दाखविला.उत्तमने तर सर्वांच्या पोटा पाण्याची व्यवस्था केलीच होती त्यातच धूमकेतूसारखा उगवून सर्वकाही आलबेल असल्याची खात्री करून घेत पुन्हा सुप्तावस्थेत जाणाऱ्या जगदीशने तर हास्याचे कारंजे उडविले.चार दिवस झोप न घेता गाणी लिहून आणलेल्या सचिनने सर्वांना लय धरून नाचविले तर सर्वच क्षेत्रातील व्यवसायात यशस्वी ठरलेल्या कर्मभूमी कोकबन मधून आलेल्या अमोलने कॉर्पोरेट मंत्रच दिले.
आठवीनंतर शाळा सोडून गेलेला व्यंकटेश आणि मग थेट मधल्या सुट्टीत अवतरलेल्या जनार्दन या दोघांनी तर आश्चर्याचे धक्केच दिले.धावती भेट देण्याचा बेत आखुन निद्रिस्त ज्वालामुखी चंद्रकांतने सुद्धा आल्याने एक मैफिल जमली तर शिक्षकी यंत्रनेची प्रतिनिधी प्रेमळ माऊली वृषाली,आयुर्विमा क्षेत्रात अग्रेसर नूतन आणि कुशाग्र बुद्धीमत्ता लाभलेली पूर्वीची अबोल,पण आता आमूलाग्र बदललेली रुपश्रीने या स्नेहसंमेलनाला जान आणली.प्रत्येक गेट टुगेदरला आवर्जून हजेरी लावणारा नंदिप व आशयपूर्ण मेसेजेस पोस्ट करणाऱ्या किशोरने याठिकाणी सर्वाँना भावून टाकले.योग्य वेळी कोपरखळी देणाऱ्या आश्लेषा,ममता,जयश्री,कल्पना,योगिता,रेश्मा, आनंता,अजय,दिलीप,संदीप ही सर्व मंडळी आमचा ग्रुप चालता बोलता ठेवतात.
हल्ली कॅलेंडरमधील वारांना फारसं महत्व राहिलेलं नसले तरी आपल्या लाडक्या रविवारला सर्वांची पसंती मिळाली. आणि २३ जानेवारी २०२२ हा स्नेहसंमेलनाचा दिवस सर्वांच्याच आयुष्याला मैत्रीचे स्पर्श करून सुखद आनंद देऊन गेल्याचे सर्वांनी अनुभवले.
Comments
Post a Comment