मालसई येथील आमदार चषक कबड्डी स्पर्धेला तुफान प्रतिसाद
जिल्ह्यातील ६४ कबड्डी संघांनी गाजविले मैदान
अटीतटीच्या सामन्यांमधून वाघेश्वर रोठ प्रथम, माणकेश्वर आमडोशी द्वितीय, नवतरुण तळाघर तृतीय तर जय हनुमान सांगडे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी
मालसई ता.रोहा येथे श्री भैरवीनाथ क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रवादी आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा दि.१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
खासदार सुनिलजी तटकरे साहेब, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवीनाथ क्रीडा मंडळाने भव्य कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मालसईच्या युवकांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन आपल्या आवडीच्या खेळाने वर्षाची सुरुवात केली. ६० किलो वजनीगटाचे सामने राज्यस्तरीय असल्यामुळे जिल्ह्यातील नावाजलेल्या संघांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला.जिल्ह्यातील ६४ संघांनी अक्षरशः मैदानावर रंगत आणली. खेळाडूंबरोबर पंचक्रोशीतीलच नव्हे तालुक्यातील प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला क्रियाशील अध्यक्षा सौ.प्रितमताई पाटील यांच्या हस्ते मैदानावर श्रीफळ वाढवून सामन्यांचे उद्धघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, वरसे गण अध्यक्ष अनंत देशमुख,कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम कराळे, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागातील सामाजिक कार्यकर्ते,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच कबड्डी रसिकांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो संघ म्हणजे वाघेश्वर रोठ,द्वितीय क्रमांक माणकेश्वर आमडोशी, तृतीय क्रमांक नवतरुण मंडळ तळाघर व चतुर्थ क्रमांक जय हनुमान सांगडे या संघांनी पटकावला.
उत्कृष्ट चढाई नवतरुण तळाघर संघाचा स्वप्नील जाईलकर, उत्कृष्ट पक्कड आमडोशी संघाचा हरिष भोसले, मालिकावीर रोठ संघाचा अशिष मोरे तर पब्लिक हिरो पारितोषिक आमडोशी संघाचा रोहित गोळे यांना देण्यात आले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील गावपंच कमिटी,सरपंच,सदस्य,भैरवीनाथ क्रीडा मंडळाचे सर्व युवक व ग्रामस्थ मंडळ मालसई यांनी अथक परिश्रम घेतले.
रोहा तालुका कबड्डी असोशिएशनने मोलाचे सहकार्य केले.आलेल्या संघांनी अतिशय शिस्तबद्ध खेळ खेळून कबड्डी प्रेमींची मने जिंकली.
Comments
Post a Comment