माणगांव तालुक्यातील कालवण गावच्या महिलांची यशोगाथा

महिलांच्या उपक्रमाला गावातील तरुण आणि ग्रामस्थांची साथ

   | माणगांव-प्रतिनिधी

माणगांव तालुक्यातील कालवण गावात महिलांनी सृजनात्मक काम हाती घेऊन नवा आदर्श निर्माण केला.त्या कामास गावातील तरुणवर्ग आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.महिलांच्या पुढाकाराने जुन्या विहिरीची साफसफाई व विहिरीच्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचे कार्य पूर्ण झाले.या जुन्या विहिरीला नवीन नयनरम्य असे सुंदर रूप आले. ह्या ऐतिहासिक विहिरीमुळेच आजवर एकदाही कालवण ग्रामस्थांवर पाणीटंचाईची वेळ आलेली नाही.निसर्गाच मोठ देणं या गावाला लाभले आहे असे म्हणता येईल.

कालवण ग्रामस्थ पूर्वपार ह्या विहिरीचा वापर हा पिण्याच्या पाण्यासाठी करित होते.परंतु काही वर्षांपूर्वी गावात नळपाणीपुरवठा सुविधा सुरू झाल्याने या जुन्या विहिरीचा वापर कमी होत गेला.परिणामी या विहिरीकडे दुर्लक्ष होऊ लागले.त्यामुळे विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ निर्माण झाला. 



तसेच विहिरीकडे येणाऱ्या मार्गाची सुद्धा दुरावस्था झाली. यावर उपाय म्हणून सर्व महिलांनी एकत्र येऊन आणि तरुणांच्या सहकार्याने या विहिरीची साफसफाई आणि रस्ता-दुरुस्ती करण्याचे ठरवले.महिलांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेस कालवण ग्रामस्थांप्रमाणे आणखी एका घटकाची मोलाची साथ मिळाली ते म्हणजे गावातील बांधकाम करणारे मेस्त्री (गवंडी) यांची. 

अखेर अनेकांचे हातभार लाभलेले हे कार्य रविवार दि.१9 व सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ या दोन दिवसात पूर्ण झाले. विहिरीला सुंदर रूप आले. 'नारी शक्तीची ताकद' यावरून लक्षात येते आणि तरुणांच्या सहकार्यामुळे 'मनात इच्छा असेल तर मार्ग मिळतोच' ह्या उक्तीनुसार हाती घेतलेले हे कार्य पुर्णत्वाला गेले.याचा आनंद उपक्रमात सहभागी सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.

ग्रामस्थांचे सहकार्य असेल तर महिला व युवावर्ग काय करु शकतो हे पाहायला मिळाले. त्रिवेणी संगम होऊन आपले इप्सित साध्य होते ह्या भावनेतुन सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे.

कालवण गावच्या महिलांनी हाती घेतलेले हे कार्य वर-वर पाहिल्यास छोटे वाटत असले तरी त्यामागे आपल्या पुर्वपार चालत आलेल्या ग्रामीण संस्कृतीची बीजे रोवली गेली आहेत.आपले प्रश्न आपणच सोडवावेत.त्यासाठी गावाचे सहकार्य घ्यावे हि आपली सहकार्याची ग्रामीण परंपरा लोप पावत चालली आहे.ठेकेदारीच्या जोखडाखाली जुंपलेल्या लोकांमुळे गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला.शासनाच्या निधीची वाट पाहण्याच्या नादात गावो-गावच्या अनेक वास्तू नष्ट झाल्या.कमिशनवर जगणारे फक्त कागदावर काम करु लागले.अशा परिस्थितीत गावासाठी काही करावे हि भावनाच मृत झाली.म्हणूनच कालवणच्या महिला व ग्रामस्थांनी केलेले हे काम कौतुकास पात्र आहे.गाव जीवंत असल्याचे ते लक्षण आहे.


Comments

Popular posts from this blog