रोह्यात सेवानिवृत्त पेन्शन दिन उत्साहात साजरा 


-कोलाड-श्याम लोखंडे

 रोहा तालुका शासकीय निमशासकीय सेवा निवृत्त संघटनेमार्फत १७ डिसेंबर हा सेवा निवृत्त वेतन दिवास ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे उत्साह वातावरणात  साजरा करण्यात आला.

कोरोना संसर्गामुळे मागील दीड -पावणे दोन वर्षाच्या कालखंडात वाढत्या वयोमानानुसार कोरोना महामारीच्या भीतीमुळे सेवा निवृतांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता.परंतु केंद्र सरकार सह राज्य शासनाने राबविलेल्या उपाय योजनामुळे कोरोना महामारी आटोक्यात आली. म्हणूनच आम्हां सेवानिवृत्तांचे जीवन सुरक्षित राहिले व हा समारंभ शासनाने घालून दिलेले नियम पाळून आनंदाने पार पाडू शकलो अशी प्रतिक्रिया उपस्थित सभासदाने यावेळी व्यक्त केली.

सर्व सभासदांनी आपले कौटुंबिक जीवन सुख समाधानाने व शांततेने जगावे याकरिता सालाबाद प्रमाणे संघटनेने श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन केले असता उपस्थित सर्व सभासदांनी श्रद्धेने व भक्ती भावाने देवतेच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ यावेळी घेतला.

सदरचा कार्यक्रम साजरा करत असतांना त्या ठिकाणी उपस्थित सभासदांसाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांचे अध्यक्षतेखाली एक छोटेखानी सभाही घेण्यात आली. सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष शांताराम गायकवाड व पदाधिकारी वर्ग उपस्थित होते.



आयोजित सभेत सेवा निवृत्तांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे निश्चित केलेल्या वेतनच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात देण्याचे महाराष्ट्र शासनाने मान्य केले आहे त्यापैकी तिसऱ्या हप्त्याची रक्कम मार्च २०२२ पर्यंत मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच १९७२ नंतरचे अनट्रेंड सेवा निवृत्त शिक्षकांना पेन्शन अद्याप दिली जात नाही. ती मिळवून देण्यासाठी संघटने मार्फत शासनाकडे अधिक पाठपुरावा करणेत येत आहे. त्या शिक्षकांना पेंशन मिळवून दिली जाईल अशी ही ग्वाही संघटनेच्या वतीने उपस्थिताना दिली.

ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त संघटनेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य पांडुरंग सरफळे(रावसाहेब) यांनी सेवा निवृत्त वेतन दिनाचे १९८२ साली घडलेल्या घटनेसहित महत्व सांगितले.महाराष्ट्र शासन सेवानिवृत्तसाठी वेळोवेळी सेवानिवृतांचे हिताचे दृष्टीने निर्णय घेत आले आहे विधवेने पुनर्विवाह केल्यास अज्ञान पाल्यासाठी कुटुंब पेन्शन योजना, शारीरिक दुर्बलता व विकलांग पाल्यासाठी त्यांचे ह्यातभर पेन्शन, अंशदान निवृत्ती वेतन तसेच महाराष्ट्र शासन वित्त व कोषागार यांचेकडून दि.११नोव्हेंबर २०२१रोजी आलेल्या आदेशासंबधी उपस्थिताना सविस्तर मार्गदर्शन केले. जुलै २०२१ पासून केंद्र सरकारने वाढविले प्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता राज्य सरकार कडून नजिकच्या काळात आपल्यालाही मिळणार आहे असेही सरफळे यांनी सांगत महाराष्ट्र शासन पेन्शनर साठी चांगले धोरण राबवत असताना शासनाच्या धोरणासंबधी संघटनेच्या कोणीही सभासदांने विरोधात मत व्यक्त करू नये अशी प्रतिक्रिया शेवटी देत आपले मनोगत व्यक्त केले.

अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या दिनाचे औचित्य साधून कै. कृष्णराव गडमुळे यांचे संघटनेसाठी मोठे योगदान होते म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती मंगला गडमुळे यांनी दोन्ही संघटनेस प्रत्येकी रु ५०००/ चा धनादेश संघटनेस सुपूर्द केला.

तसेच संध्या मळेकर व रमाकांत चंदने यांनीही संघटनेस प्रत्येकी रु १०००/-ची देणगी दिली. संघटनेचे अध्यक्ष मारुती राऊत यांनी सर्वासाठी नास्ता चहापाणी व्यवस्था केली तर शरद नागवेकर दाम्पत्यांनी श्री सत्यनारायण महापूजा व प्रसादाने योगदान दिले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटना सचिव नारायण पाटील, सुरेश मोरे सर, गावडे गुरुजी, वालेकर अण्णा, ह.भ.प. बाळाराम महाराज शेळके, शैलजा देसाई, संगीता वेदपाठक, संध्या मळेकर, शिल्पा आठवले यांनी चांगले सहकार्य केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शेखर गुंड यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणेत आली.

Comments

Popular posts from this blog