उरणमधील अनधिकृत कंटेनर यार्डवर कारवाई करा

अन्यथा 26 जानेवारीला पत्रकार करणार लाक्षणिक उपोषण !!!

उरण -विशेष प्रतिनिधी 
      उरण तालुक्यात सततच्या वाहतूक कोंडीला आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे सर्व अनधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामांवर कारवाई करून ते बंद करावेत अन्यथा उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उरण मधील पत्रकार तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उरणच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, माय मराठी संपादक विरेश मोडखरकर, संजय गायकवाड, अजित पाटील, दिलीप कडू, आशिष पाटील, पूजा चव्हाण, पंकज ठाकूर, विशाल गाडे, प्रवीण कोलापटे, सुयोग  गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते. 

           उरण तालुक्यातील  राज्यमहामार्ग ५४ आणि राष्ट्रीय महामार्ग ४ ब लगत अनेक बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे उभी राहिली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांची केवळ यादी तहसील कार्यालयाकडून दिली जात असली तरीही अशा बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामांवर प्रत्यक्ष कारवाई मात्र होतांना दिसत नाही . या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामां शेजारील रस्त्यांच्या मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसूंन येत आहे आहे. ज्यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होत असते. त्याचप्रमाणे वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कींग सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे .  अशा काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळे निर्माण झाली आहेत जी वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहे. उपरोक्त  राज्यमहामार्ग ५४ आणि राष्ट्रीय महामार्ग ४ ब या रस्त्यांलगत असलेले सर्व्हिस रोड महामार्गांलगत असणाऱ्या गावांना जोडण्यासाठी बनवण्यात आले आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येत नाही. मात्र सर्व्हिस रोडचा वापर बेधडकपणे अवजड वाहने करत आहेत. यामुळे होणाऱ्या अपघातामधे सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या सर्व प्रकरणांची जड कशात आहेत तर ती या सर्व बेकायदा कंटेनर यार्ड आणि गोदामांमध्ये आहे असे दिसून येत आहे. त्यामुळेच " ना रहेगी बासुरी ना रहेगा बाज " या उक्तीप्रमाणे वाढते अपघात , वाहतूक कोंडी आदी प्रकारांना कारणीभूत असलेल्या आणि तहसील कार्यालयाच्या यादीनुसार मुळातच बेकायदेशीर असलेल्या उरण तालुक्यातील सर्वच  बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे तात्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे करण्यात आली आहे.

          पत्रकार संघाच्या मागणीनुसार संबंधित बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामे यांच्यावर तातडीने कारवाई करून ती सर्व बंद न केल्यास नाईलाज म्हणून उरण तालुक्यातील पत्रकार उरण तालुका मराठी पत्रकार संघ्याच्या वतीने  दि.२६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे. या उपोषणानंतरही प्रशासनावर कोणताही फरक न पडल्यास पुढील निर्णय म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना या आंदोलनात उतरवून आणखीन तीव्र आंदोलन करावे लागेल असा अंतिम इशारा ही या निमित्ताने देण्यात आला आहे .

Comments

Popular posts from this blog