रोह्यातून आळंदीकडे निघालेल्या दिंडीचे कुरवंडे गावात स्वागत

ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात वारकरी तल्लीन


धाटाव-शशिकांत मोरे

     रायगड जिल्ह्यातील रोह्यातुन पायीवारीसाठी निघालेला वैष्णवांचा मेळा नुकताच आळंदीकडे प्रस्थान झाला. हेदवली,जांभुळपाड़ा,येथून थेट पुणे जिल्ह्यात लोणावला(कुरवंडे) येथे ही दिंडी आली असता जल्लोषात स्वागत करण्यात आले.या दिंडीत हरिनामाच्या गजरात वारकरी,महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन तल्लीन झाले.ज्ञानबा तुकाराम असा जयघोष साऱ्यांच्या मुखात असल्याने किती चालतोय याचे भान मात्र वारकरी विसरले असल्याचे पहावयास मिळाले.

रायगड भूषण ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा ते आळंदी कडे निघालेल्या दिंडीचे जागो- जागी स्वागत होत असताना कुरवंडे येथे गावातील महिलांनी दिंडीचे औक्षण केले.याठिकाणी मैदानात दिंडीतील वारकरी व महिलांनी गोल रिंगण धरित मोठ्या जल्लोषात हरीनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचण्याचा आनंद घेतला.येथील ह.भ.प.सुभाष महाराज पडवळ यांच्या निवासस्थानी दिंडीतील वारकरी वर्गाची चहा,नास्ता,व भोजन व्यवस्था उत्तम पद्धतीने केली होती.या ठिकाणी पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ व किर्तन करण्यात आले.
दरवर्षी कुरवंडे येथे येत असलेल्या दिंडीच्या हरिपाठ पाहण्याकरीता या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या दिंडीची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद पडवळ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळाला. दिंडीने आज पुढे ब्राह्मणवाडीकडे  सकाळी प्रस्थान केले असून याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम पाटील महाराज यांनी सांगितले.

  दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापुर-कर्जतच्या दिंडीला मावळ येथे अपघात झाल्याने त्यातील मृत चार वारकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली व जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी विठूरायाकडे साकडे घालण्यात आले.

Comments

Popular posts from this blog